संयुक्त अरब अमिराती येथे २०१९ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या एएफसी आशियाई चषक फुटबॉल स्पध्रेच्या पात्रता फेरीत भारताला लाओसचे आव्हान पेलावे लागणार आहे. या लढतीसाठी लाओसला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाला दुखापतीने घेरले. गुवाहटी येथील सराव सत्रात मध्यरक्षक विनीत रायला दुखापत झाल्यामुळे संघासमोरील अडचण वाढली आहे. उभय संघांमध्ये पहिला सामना २ जूनला लाओस येथे होणार असून परतीचा सामना ७ जूनला गुवाहटी येथे खेळविण्यात येणार आहे.

बाद फेरीच्या या सामन्यात विजय मिळवून पात्रता फेरीत प्रवेश करण्याचे आव्हान भारतीय संघाला पेलावे लागणार आहे. २०१८ साली होणाऱ्या फिफा विश्वचषक स्पध्रेच्या पात्रता फेरीत भारताला ३ गुणांसह ‘ड’ गटात पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे त्यांना आशिया चषक स्पध्रेच्या पात्रता फेरीतही प्रवेश मिळवता आलेला नाही. विनीतसह भारतीय संघात आणखी सात खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. यामध्ये मध्यरक्षक रोवनीन बोर्गेस, प्रोणय हल्दर, कॅबीन लोबो, बिकास जैरू आणि बचावपटू ऑगस्टाईन फर्नाडिस यांनाही दुखापतीमुळे वगळण्यात आले आहे.     विनीतच्या दुखापतीबाबत मुख्य प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टनटाईन म्हणाले की, ‘विनीतच्या दुखापतीमुळे आम्हाला ऐन वेळी बदल करावा लागला. लाओसविरुद्ध २१ जणांचा संघ आम्ही निवडला होता, परंतु आता २० जणांसहच आम्ही लाओसला जात आहोत.’

भारतीय संघ –

गोलरक्षक : सुब्राता पॉल, गुरप्रीत सिंग संधू, अमरिंदर सिंग; बचावपटू : रिनो अँटो, किगेन परेरा, प्रीतम कोटल, अर्नब मोंडल, संदेश झिंघन, चिंग्लेनसन सिंग, फुल्गँसो काडरेझो, नारायण दास; मध्यरक्षक : उदांता सिंग, हलीचरण नार्झरी, सैत्यसेन सिंग, मोहम्मद रफिक, इग्वेंसन लिंगडोह, जॅकीचंद सिंग, अ‍ॅल्वीन जॉर्ज; आघाडीपटू : सुमित पस्सी, जेजे लाल्पेखलुआ, सुनील छेत्री.