भारतीय फुटबॉलपटूंच्या मानसिकतेवरच या देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रगती अवलंबून आहे, असे मत ब्राझीलचे ज्येष्ठ खेळाडू झिको यांनी व्यक्त केले. इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेला रविवारी प्रारंभ होत असून, गोवा फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी झिको सांभाळणार आहेत.
देशातील फुटबॉलच्या परिस्थितीबाबत ताशेरे ओढताना झिको म्हणाले की, ‘‘भारत हा खूप मोठा देश असूनही या देशाने जागतिक स्तरावर या खेळात अपेक्षेइतकी प्रगती केलेली नाही याचेच आश्चर्य वाटते. जपानसारख्या छोटय़ा देशानेही जागतिक स्तरावर या खेळात मोठे आव्हान निर्माण केले आहे. मी २००४मध्ये भारतात विश्वचषक पात्रता फेरीसाठी आलो होतो. कोलकाता येथील स्टेडियमवर झालेल्या या लढतींच्या वेळी प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला होता. ही गोष्ट लक्षात घेता फुटबॉलबाबत येथे किती लोकप्रियता आहे, याची मला जाणीव झाली होती. तेव्हापासूनच मी भारतात संधी मिळाली तर प्रशिक्षक म्हणून काम करण्यासाठी येण्याचे निश्चित केले होते.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘देशाला खरोखरच या खेळात चांगले स्थान मिळवायचे असेल तर खेळाडूंचे मनोधैर्य उंचावलेले पाहिजे, तसेच नवीन बदल आत्मसात करण्यासाठी त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टिकोन असण्याची गरज आहे. आमच्या अनुभवाचा त्यांना आम्ही निश्चित फायदा करून देऊ, मात्र खेळाडूंनी आम्ही केलेल्या सूचनांप्रमाणे आपल्यात सुधारणा करण्याची गरज आहे. फुटबॉल संघटना व शासनाचीही त्याकरिता मदतीची आवश्यकता आहे.’’
‘‘आशियाई स्तरावर या खेळाचा चांगला विकास झाला आहे. मी येथे भारतीय खेळाडूंचा विकास करण्यासाठीच आलो आहे. सर्वोत्तम यश मिळविण्यासाठी खेळाडूंनी खूप मेहनत केली पाहिजे. ज्याप्रमाणे मी माझ्या देशात खेळाच्या विकासाकरिता प्रयत्न केले आहेत, तसेच प्रयत्न मी येथेही करणार आहे. माझ्याकडील माहिती व कौशल्याचा उपयोग खेळाडूंसाठी करीन, मात्र त्याला खेळाडूंनी मनापासून सहकार्य केले पाहिजे,’’ असेही झिको यांनी सांगितले.
गोवा संघाविषयी झिको यांनी सांगितले की, ‘‘गोव्यातील फुटबॉलबाबत खूप ऐकून आहे. या संघातही अनेक नैपुण्यवान खेळाडू आहेत. त्यांच्याकडील गुणांना योग्य दिशा देत आयएसएलमध्ये त्यांना विजेतेपद मिळवून देण्याची जबाबदारी मी निश्चित पार पाडणार आहे.’’
मुंबई सिटी एफसीचे नेतृत्व नबीकडे
मुंबई : रविवारी मुंबई सिटी फुटबॉल क्लबचा सलामीचा सामना अ‍ॅटलेटिको डी कोलकाता संघाशी रंगणार आहे. या पाश्र्वभूमीवर मुंबई सिटी एफसी संघाच्या नेतृत्वाची धुरा भारताचा मध्यरक्षक सईद रहिम नबीकडे सोपवण्यात आले आहे. जर्मनीचा माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू मॅन्युअल फ्रेडरिच या संघाचा उपकर्णधार असेल.