आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने रविवारी झालेल्या बैठकीत युएईमध्ये खेळवल्या जाणाऱ्या तेराव्या हंगामाची अधिकृत घोषणा केली आहे. या स्पर्धेसाठी अद्याप केंद्र सरकारकडून परवानगी आली नसली तरीही येत्या काही दिवसांत ती मिळेल अशी माहिती गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली. केंद्र सरकारच्या इतर विभागांनी स्पर्धेला हिरवा कंदील दाखवला असून उर्वरित परवानग्या लवकरच मिळतील अशी माहिती गव्हर्निंग काऊन्सिलच्या सदस्याने वृत्तसंस्थेशी बोलताना दिली, १९ सप्टेंबरपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून नवीन वेळापत्रकानुसार अंतिम सामना १० नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. याचसोबत सर्व सामने हे रात्री साडे सात वाजता सुरु होणार असल्याचं कळतंय.

तेराव्या हंगामाच्या आयोजनाबद्दल रविवारी गव्हर्निंग काऊन्सिलची बैठक आयोजित करण्यात आली होती. याआधी तेराव्या हंगामाचा अंतिम सामना हा ८ नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येणार होता. परंतू करोनामुळे तयार करण्यात आलेले नवीन नियम, भारतीय संघाचा आगामी ऑस्ट्रेलिया दौरा आणि दोन सामन्यांमध्ये खेळाडूंना पुरेसा वेळ मिळाला यासाठी स्पर्धेच्या अंतिम सामन्याची तारीख बदलून ८ ऐवजी १० करण्यात आल्याचं कळतंय. याचसोबत सध्याच्या हंगामासाठी VIVO हीच कंपनी स्पर्धेची मुख्य स्पॉन्सर राहणार असल्याचं निश्चीत झालंय.

स्पर्धेला प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी मिळणार का यावरही गव्हर्निंग काऊन्सिलच्या सदस्यांनी माहिती दिली. “खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी मैदानात प्रेक्षक असले तर चांगलच आहे. परंतू खेळाडू आणि पर्यायाने प्रेक्षकांची सुरक्षा हा देखील महत्वाचा मुद्दा आहे. यासाठी युएई क्रिकेट संघनेसोबत चर्चा करुन योग्यवेळी निर्णय घेतला जाईल.” गव्हर्निंग काऊन्सिलने सर्व संघमालकांना खेळाडूंच्या व्हिसाची प्रक्रिया सुरु करण्याचेही आदेश दिले आहेत.