आयपीएलचा तेरावा हंगाम आयोजित करण्यासाठी बीसीसीआयसमोरचा रस्ता आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने बीसीसीआयला आयपीएलचं आयोजन युएईमध्ये करण्याची परवानगी दिली आहे. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी पीटीआयशी बोलताना ही माहिती दिली. गव्हर्निंग काऊन्सिलने याआधीच १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात आयपीएलचं आयोजन होणार असल्याचं जाहीर केलं होतं. या स्पर्धेसाठी क्रीडा मंत्रालय व अन्य संबंधित सरकारी यंत्रणांची परवानगी बीसीसीआयला मिळाली होती. फक्त गृह मंत्रालयाच्या परवानगी राहिली होती, ती मिळाल्यानंतर बीसीसीआयचा रस्ता आता मोकळा झाला आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून प्रस्तावित असलेल्या परवानगीबद्दल विचारलं असता ब्रिजेश पटेल यांनी, बीसीसीआयला सर्व परवानगी लिखीत स्वरुपात मिळाली असल्याचं सांगितलं. भारतातली कोणतीही स्पर्धा देशाबाहेर आयोजित करायची असल्यास त्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाची परवानगी मिळणं गरजेचं असतं. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने स्पर्धेला तत्वतः मान्यता दिली होती. यानंतर गृह मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवल्यानंतर यंदाच्या आयपीएलवर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब झालं आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 स्पॉन्सरशिपच्या शर्यतीत पतंजलीची उडी

काही दिवसांपूर्वी आम्हाला सरकारी अधिकाऱ्यांची चर्चेदरम्यान परवानगी दिली होती. त्यानंतर आम्ही लगेचच युएई क्रिकेट बोर्डाला याची माहिती देत तयारी करण्यास सांगितलं. आता तर सरकारची अधिकृत परवानगी आल्यानंतर आम्ही संघमालकांनाही तयारी करण्यास सांगितल्याचं, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना सांगितलं. करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, सर्व नियमांचं पालन केल्यानंतर २० ऑगस्टनंतर सर्व संघांना युएई करता रवाना होण्याची परवानगी बीसीसीआयने दिली आहे.