पुढील मोसमासाठी कारमध्ये सुधारणा करणे आणि या मोसमाच्या मध्यात टायरमध्ये करण्यात आलेले बदल, यामुळे सहारा फोर्स इंडिया संघाचे भाग्य उजळलेच नाही. त्यामुळेच रविवारी घरच्या मैदानावर रंगणाऱ्या इंडियन ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीत गुण पटकावणे फोर्स इंडिया संघासाठी आव्हानात्मक होऊन बसले आहे. तरीही घरच्या प्रेक्षकांसमोर कामगिरी उंचावण्यासाठी फोर्स इंडिया संघ सज्ज झाला आहे.
फॉम्र्युला-वनमधील या भारताच्या संघाने या मोसमातील पहिल्या टप्प्यात सुरेख कामगिरी करून पाचव्या स्थानाची दावेदारी केली होती. पण आता फोर्स इंडिया संघासाठी सहावे स्थान मिळवणेही कठीण झाले आहे. पहिल्या आठ शर्यतीत फोर्स इंडियाने ५९ गुणांची कमाई केली होती. त्यानंतरच्या सात शर्यतींत भारतीय संघाला फक्त तीन गुण मिळवता आले आहेत. ‘‘फोर्स इंडियाकडे पूर्वीपेक्षा चांगले ड्रायव्हर आहेत. पण टायरमुळे कारचा वेग मंदावल्याने आम्हाला सुरेख कामगिरीचे प्रदर्शन करता येत नाही. आता पुढील वर्षीसाठी सज्ज होण्याकडे आमचे लक्ष लागले आहे,’’ असे अनुभवी ड्रायव्हर एड्रियन सुटीलने सांगितले.
गेल्या चार शर्यतींत फोर्स इंडियाला एक गुण मिळवता आला. याविषयी दुसरा ड्रायव्हर पॉल डी रेस्टा म्हणाला, ‘‘मायदेशात होणाऱ्या शर्यतीतही हे चित्र बदलणार नाही. कागदावर आमचा संघ मजबूत वाटत आहे. पण प्रत्यक्षात मात्र टायरबदलाचा फटका आमच्या कामगिरीवर बसला आहे. शुक्रवारी आणि शनिवारी होणाऱ्या पात्रता शर्यतीत आम्ही चांगली कामगिरी करू, असा विश्वास आहे.’’