अरुणा रेड्डी हिने ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक मिळवीत ऐतिहासिक कामगिरी केली. जागतिक स्पर्धेत पदक मिळविणारी ती पहिली भारतीय जिम्नॅस्ट आहे.

रस्त्यावरून जाताना डोंबाऱ्याची मुले हालणाऱ्या काठीवर तोल सांभाळत कसरत करीत असताना आपला श्वास क्षणभर रोखला जातो. सर्कशीत उंच झोपाळ्यांवर सहजपणे उडय़ा मारणारे कलाकार पाहून आश्चर्यचकित व्हायला होते. या सर्वाचे कौशल्य पाहिल्यावर ही मुलेमुली जिम्नॅस्टिक्समध्ये ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत पदके मिळवतील असे अनेक वेळा मनात येते. पण दुर्दैवाने हे नैपुण्य विकसित होतच नाही. त्यामुळेच दीपा कर्माकर व अरुणा रेड्डी यांच्यासारख्या मोजक्याच खेळाडूंवर आपले जिम्नॅस्टिक्स क्षेत्र अवलंबून आहे.

जिम्नॅस्टिक्स हा ऑलिम्पिकमधील अतिशय विलोभनीय क्रीडा प्रकार समजला जातो, त्यामध्ये पदके मिळविण्याच्या भरपूर संधी उपलब्ध असतात. मात्र दुर्दैवाने आपल्या देशास या क्रीडाप्रकारात ऑलिम्पिक पदक  मिळविता आलेले नाही. अरुणा रेड्डी हिने ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक मिळवीत ऐतिहासिक कामगिरी केली. जागतिक स्पर्धेत पदक मिळविणारी ती पहिली भारतीय जिम्नॅस्ट आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही तिचे हे पहिलेच पदक आहे. तिचे रौप्यपदक थोडक्यात हुकले. अरुणाने तिचे कांस्यपदक तिच्या वडिलांना अर्पण केले आहे. तिच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले.

खरंतर अरुणाला लहानपणापासून कराटेची आवड होती. तिचे वडील नारायण हे स्वत: कराटे या खेळात अव्वल दर्जाचे खेळाडू होते. त्यांचेच मार्गदर्शन तिला मिळत होते. पण आपल्या मुलीला क्रीडाप्रकारात देशाचं नाव उंचावायचं असेल तर जिम्नॅस्टिक्स हा तिच्यासाठी योग्य क्रीडाप्रकार आहे, असे त्यांचे मत होते. तसेच अरुणामध्ये असलेली लवचीकता पाहून ती जिम्नॅस्टिक्समध्ये चमक दाखवू शकेल असे त्यांचे मत होते. त्यामुळेच त्यांनी अरुणाला जिम्नॅस्टिक्सच्या सरावास प्रवृत्त केले. खरं तर अरुणाने वडिलांचा आग्रह म्हणून नाईलाजास्तव या खेळाचा सराव सुरू केला.

कोणत्याही खेळाडूला पदक मिळाल्यानंतरच त्या खेळाची गोडी निर्माण होते. अरुणाबाबत असेच घडले. राष्ट्रीय स्तरावर पहिले पदके मिळाल्यानंतर तिने जिम्नॅस्टिक्समध्येच स्पर्धात्मक करिअर करण्याचा निर्णय केला. तिने तीन वेळा जागतिक स्पर्धेत पदक मिळविण्यासाठी प्रयत्न केला मात्र त्यामध्ये तिला यश मिळाले नव्हते. तथापि या स्पर्धामधील अनुभवाचा फायदा तिला यंदाच्या जागतिक स्पर्धेसाठी झाला. तिने चीन, कोरिया, जपान आदी तुल्यबळ देशांचे खेळाडू असतानाही मिळविलेले कांस्यपदक खरोखरीच प्रेरणादायक आहे.

रिओ येथे २०१६ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताची जिम्नॅस्ट दीपा कर्माकर हिला कांस्यपदकापासून वंचित रहावे लागले होते. त्या वेळी अंतिम फेरीसाठी तिने प्रोडय़ुनोवा हा अतिशय अवघड व दुखापतीच्या अधिक शक्यता असलेला क्रीडा प्रकार निवडला होता. पदक मिळविण्यासाठी तिने पराक्रमाची शर्थ केली तथापि कांस्य पदकाने तिला हुलकावणी दिली. तिची स्पर्धा सुरू असताना भारतात मध्यरात्र होती तरीही लाखो क्रीडा चाहत्यांनी त्याचे थेट प्रक्षेपण पाहण्याचा आनंद घेतला होता. पदक  हुकल्यानंतर दीपाबरोबरच तिच्या चाहत्यांना खूप हळहळ वाटली होती. दीपाचे प्रशिक्षक बिश्वेश्वर नंदी यांच्याच अकादमीत अरुणा सराव करते. ब्रिजकिशोर हे तिचे वैयक्तिक प्रशिक्षक आहेत या दोन्ही प्रशिक्षकांमुळे अरुणाच्या कौशल्यात खूप सुधारणा झाली आहे. ती दीपाबरोबरच सराव करते. दोन्ही खेळाडू एकाच क्रीडा प्रकारात असल्या तरीही त्यांच्यात कधीही शत्रुत्व नाही. अरुणा ही दीपास मोठी बहीण मानून वेळोवेळी दीपाकडून अनेक वेळा मौलिक सल्ले घेते. दुखापतीमुळे दीपास जागतिक स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. त्या वेळी दीपापेक्षाही जास्त दु:ख अरुणास झाले. जागतिक स्पर्धेस रवाना होण्यापूर्वी अरुणाने दीपाकडूनही मौलिक मार्गदर्शन घेतले. त्याचाही फायदा अरुणास पदक मिळविण्यासाठी झाला आहे. अरुणाने वयाच्या २२ व्या वर्षी हे पदक मिळविले. जिम्नॅस्टिक्समध्ये चीन, कोरिया, जपान आदी देशांचे खेळाडू साधारणपणे वयाच्या १५ ते २० वर्षे या कालावधीत पदकांची लयलूट करीत असतात. यंदा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा आदी महत्त्वाच्या स्पर्धा आहेत. अरुणास आपल्या शिरपेचात या स्पर्धामधील पदकांची मोहोर नोंदविण्यासाठी भरपूर संधी उपलब्ध आहे.

टोकियो येथे आणखी दोन वर्षांनी ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत अरुणा व दीपा यांच्यासह भारतीय खेळाडूंना जिम्नॅस्टिक्समध्ये पदक कशी मिळविता येईल याचा विचार आपल्या संघटकांनी केला पाहिजे. मुळातच स्पर्धात्मक कौशल्याचा विचार केला तर आपले खेळाडू आंतरराष्ट्रीय पदकांपासून अनेक वेळा वंचित राहिले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये दूरदर्शनच्या विविध वाहिन्यांवर नृत्य किंवा कसरतींचा समावेश असलेल्या अनेक कार्यक्रमांची रेलचेल पाहावयास मिळत असते. त्यामध्ये सहभागी होणाऱ्या लहान मुला-मुलींची लवचीकता व चिकाटी पाहिली तर परीक्षकांसह सर्वच जण थक्क होतात. या मुलामुलींनी जिम्नॅस्टिक्समध्ये स्पर्धात्मक करिअर निवडले तर अनेक ऑलिम्पिक पदके आपल्या देशास मिळतील, असे नेहमी ऐकावयास मिळते. जिम्नॅस्टिक्समध्ये राष्ट्रीय स्तरावर असलेल्या गटबाजीमुळे काही वर्षे विविध वयोगटांच्या राष्ट्रीय स्पर्धाच झाल्या नव्हत्या. स्पर्धाच होत नसतील तर खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी तरी कशी मिळणार? पालकही त्यामुळे आपल्या मुलांना या खेळात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देत नाहीत. याबाबत जिम्नॅस्टिक्स संघटकांनी त्वरित हालचाली करून आपले खेळाडू स्पर्धापासून वंचित राहणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे.

प्रशिक्षणाच्या पद्धतीत नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असते. भारतीय क्रीडा प्राधिकरण व केंद्र शासनाकडून या खेळासाठी खूप मदत मिळत असते. तरीही प्रशिक्षकांकरिता प्रशिक्षण शिबिर आयोजित केले तर आपोआपच प्रशिक्षकांचा दर्जा उंचावण्यास मदत मिळेल. जिम्नॅस्टिक्सकरिता नैपुण्य आहे मात्र प्रशिक्षकांची कमतरता आहे. त्यामुळेच उत्तम दर्जाचे प्रशिक्षक घडविण्याची आवश्यकता आहे. दीपाने ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठल्यामुळे या खेळात मुलींचा सहभाग वाढला आहे. मात्र खेळाडूंना अव्वल दर्जाच्या क्रीडा सुविधा देण्याची गरज आहे. देशाच्या महत्त्वाच्या शहरांमध्ये जिम्नॅस्टिक्स अकादमी स्थापन केल्या पाहिजेत. संघटनात्मक स्तरावरील मतभेद बाजूला ठेवीत सबज्युनिअर, कुमार व वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धा वेळेवर घेतल्या जातील असे कटाक्षाने पाहण्याची गरज आहे. केंद्र व राज्य शासनाकडून खेळाडूंकरिता व क्रीडा विकासाकरिता भरपूर योजना आहेत. जिम्नॅस्टिक्सकरिता आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यासाठीही त्यांच्याकडून आर्थिक पाठबळ मिळत असते. संघटकांनी इच्छाशक्ती दाखविली तर आपल्या देशात अनेक ऑलिम्पिक जिम्नॅस्ट घडू शकतील.
मिलिंद ढमढेरे – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा