भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिका

नॅपियरला आज एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील ऐतिहासिक यशानंतर आता भारतीय संघापुढे भक्कम संघबांधणी असलेल्या न्यूझीलंडचे कठीण आव्हान समोर आहे. पाच एकदिवसीय सामन्यांच्या क्रिकेट मालिकेतील पहिला सामना बुधवारी नॅपियर पार्क येथील मॅकलीन पार्क येथे होणार असून, भारताचे पारडे न्यूझीलंडपेक्षा जड मानले जात आहे.

ऑस्ट्रेलियात प्रथमच एकदिवसीय मालिका जिंकण्याचा पराक्रम भारतीय संघाने दाखवला असला तरी आगामी विश्वचषक क्रिकेट स्पध्रेच्या दृष्टीने मधल्या फळी बांधणी हे प्रमुख आव्हान असेल. महेंद्रसिंह धोनीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सलग तीन अर्धशतके झळकावून मालिकावीर पुरस्कार पटकावला असला तरी न्यूझीलंडच्या वैविध्यपूर्ण वेगवान माऱ्याचा सामना करणे आव्हानात्मक असेल. ट्रेंट बोल्ट, टिम साऊदी आणि लॉकी फग्र्युसन हे त्रिकूट न्यूझीलंडच्या वेगवान माऱ्याची धुरा सांभाळेल.

न्यूझीलंडमधील ३५ एकदिवसीय सामन्यांपैकी फक्त १० सामने भारताला आतापर्यंत जिंकता आले आहेत. याशिवाय २०१४ मधील एकदिवसीय मालिकासुद्धा भारताने ०-४ अशी गमावली होती. न्यूझीलंडच्या दर्जेदार खेळाडूंच्या क्षमतेची कर्णधार विराट कोहलीला पूर्णत: जाणीव आहे.

भारतापुढे आता शिखर धवनची कामगिरी आणि धोनीचा फलंदाजीचा क्रम या महत्त्वाच्या समस्या आहेत. याशिवाय हार्दिक पंडय़ाचे निलंबन संपेपर्यंत संघाचा समतोल साधणे कठीण जाणार आहे. धवन सलामीच्या स्थानाला सध्या योग्य न्याय देत नाही. मागील नऊ सामन्यांत ३५ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. शुभमन गिल हा सलामीचा आणखी एक पर्याय उपलब्ध असला तरी काही अपयशांमुळे धवनला वगळण्याचा धोका संघव्यवस्थापन पत्करणार नाही. अंबाती रायुडूने चौथ्या स्थानासाठी आपली दावेदारी केली होती; परंतु प्रथम श्रेणी क्रिकेटमधील निवृत्तीनंतर तो या स्थानाला न्याय देऊ शकलेला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात धोनी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता. परंतु सामन्यानुरूप धोनीवर अवलंबून राहण्याचे कोहलीचे धोरण आहे.

संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, दिनेश कार्तिक, विजय शंकर, शुभमन गिल, यजुर्वेद चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, खलील अहमद, रवींद्र जडेजा.

न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), रॉस टेलर, टॉम लॅथम, मार्टिन गप्तील, कॉलिन डी ग्रँडहोम, ट्रेंट बोल्ट, हेन्री निकोल्स, डग ब्रेसवेल, लॉकी फग्र्युसन, मॅट हेन्री, कॉलिन मुन्रो, इश सोधी, मिचेल सँटनर, टिम साऊदी.

सामन्याची वेळ : सकाळी ७.३० वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १.