|| तुषार वैती

भारतीय हॉकीसाठी २०१८ हे वर्ष अपयशाच्या मालिकेने खचाखच भरलेले असतानाच नववर्षांत तरी नशीब पालटेल, अशी अपेक्षा केली जात होती. राष्ट्रकुल, आशियाई क्रीडा स्पर्धा तसेच विश्वचषक स्पर्धेत ऐनवेळी भारतीय संघाच्या पदरी अपयश आले. गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेचे जेतेपद आपल्याकडेच राखून टोक्यो ऑलिम्पिकसाठी थेट पात्र होण्याची संधी असतानाही महत्त्वाच्या क्षणी भारतीय संघाने कच खाल्ली आणि ऑलिम्पिक पात्रतेवर पाणी सोडावे लागले. भुवनेश्वर येथे झालेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेतही तोच कित्ता भारताने गमावला. कामगिरी आणि क्रमवारीत सुधारणा होत असतानाही अखेरच्या क्षणी कच खाण्याची वृत्ती भारताला मारक ठरत आहे. काही दिवसांपूर्वी मलेशियात झालेल्या सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेतही त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा पाहायला मिळाला.

भारतीय क्रीडाक्षेत्रात प्रशासकीय पारदर्शकतेचा अभाव असल्याचे चित्र वारंवार पाहायला मिळत आहे. भारतीय हॉकीला सुरुवातीपासूनच एककल्ली कारभाराची कीड लागलेली आहे. प्रशिक्षकांची हकालपट्टी, अनुभवी खेळाडूंना डच्चू, उच्च कामगिरी संचालकांची नियुक्ती आणि त्यानंतर पुन्हा एकदा या सर्वाची उचलबांगडी या एकाधिकारशाहीच्या वाळवीमुळे भारतीय हॉकीची आणखीनच वाताहत होत आहे.

२०१७ मध्ये रोएलंट ओल्टमन्स यांची खराब कामगिरीमुळे हकालपट्टी करण्यात आल्यानंतर अनेक वर्षांनंतर हरेंद्र सिंग यांच्या रूपाने हॉकी संघाला भारतीय प्रशिक्षक मिळाला. हरेंद्र यांनी भारतीय हॉकीत अनेक बदल करण्याचे प्रयत्न केले. खेळाडूंशी त्यांचे चांगले सूर जमले होते. प्रत्येक खेळाडूकडून चांगली कामगिरी करवून घेण्यात ते वाकबगार होते. मात्र हॉकी विश्वचषक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत भारताचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर कोणतेही कारण न देता हरेंद्र सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली.

हॉकी इंडियाच्या मनमानी कारभारामुळे भारतीय संघावर सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेत प्रशिक्षकाविना खेळण्याची वेळ आली. मात्र प्रशिक्षक असताना किंवा नसताना, भारतीय संघाच्या कामगिरीत कोणताही फरक पडलेला नाही. महत्त्वाच्या क्षणी प्रतिस्पध्र्याकडून गोल पत्करणे, दबावाखाली चुकांची पुनरावृत्ती करणे, पहिल्यांदा गोल करूनही सामना गमावणे आणि पेनल्टी-शूटआऊटमध्ये दडपणाखाली कामगिरी खालावणे, या सर्व गोष्टी आता हॉकी संघाच्या बाबतीत नित्यनेमाच्या झाल्या आहेत. गेल्या वर्षभरातील कामगिरीचा आढावा घेतल्यास, भारतीय संघाने त्याच चुका पुन:पुन्हा केल्या आहेत.

भारताचा सर्वोत्तम बचावपटू म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या अमित रोहिदासकडून मोक्याच्या क्षणी चुका होत आहेत. त्यामुळे प्रतिस्पध्र्याना सामन्यात पुनरागमन करण्याची संधी मिळत आहे. अझलन शाह स्पर्धेच्या अंतिम फेरीतही रोहिदासच्या चुकीमुळे कोरियाने सामन्यात बरोबरी साधली. त्याच्याकडून पहिल्यांदा अशी चूक घडली नाही. राष्ट्रकुल स्पर्धा, विश्वचषक स्पर्धेनंतर त्याने अझलन शाह स्पर्धेत बचावात केलेली घोडचूक भारताला भोवली आहे. गोलरक्षकाचे अपयश ही चिंता आता भारताला सतावू लागली आहे. पेनल्टी-शूटआऊटमध्ये अनुभवी पी. आर. श्रीजेशऐवजी युवा गोलरक्षकांना संधी देण्याची चूक भारताला भोवत आहे. अझलन शाह स्पर्धेच्या अंतिम फेरीतही भारताला त्याचा फटका बसला. श्रीजेशऐवजी संधी मिळालेल्या कृष्णन पाठकला दक्षिण कोरियाचा एकही गोल अडवता आला नाही.

विश्वचषक स्पर्धेच्या तयारीपासून भारतीय संघाला गेल्या १२ महिन्यांपासून विश्रांती मिळालेली नाही. त्यातच ग्वाल्हेर येथे झालेल्या राष्ट्रीय शिबिरानंतर भारताचे जवळपास अर्धा डझनपेक्षा अनुभवी खेळाडू जायबंदी झाले आहेत. त्यामुळे भारताला आतापासूनच सावधगिरी बाळगावी लागणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघ चाचपडत आहे, हे चित्र गेल्या काही वर्षांपासून बदललेले नाही. बहुतेक संघांनी अंगीकारलेली शैली आणि खेळाचे स्वरूप भारतीय संघानेही अवलंबले आहे. मात्र तरीही भारताच्या पदरी अपयशच येत आहे.

एप्रिल महिन्यापासून ऑस्ट्रेलियाचे ग्रॅहम रेड हे हरेंद्र सिंग यांची जागा घेणार आहेत. पुन्हा एकदा परदेशी प्रशिक्षक भारतीय पुरुष हॉकी संघाच्या दिमतीला येणार आहे. पण भारताच्या सातत्यपूर्ण चुकांवर त्यांना कायमस्वरूपी तोडगा काढावा लागणार आहे. दुबळ्या संघांचा समावेश असलेल्या अझलन शाह स्पर्धेला फारसे महत्त्व नसल्यामुळे भारताच्या चुका चालून जातीलही. पण ऑलिम्पिकचे तिकीट मिळवण्याची मोजकीच संधी भारताला मिळणार आहे. त्यामुळे कमी कालावधीत मोठे यश संपादन करण्याचे आव्हान ग्रॅहम रेड यांच्यासह भारतीय हॉकीपटूंवर असेल. वेळीच चुकांची पुनरावृत्ती टाळली नाही तर २०२० टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणे, हे भारतीय हॉकी संघासाठी दिवास्वप्नच ठरेल.