राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धा
अ‍ॅथलेटिक्स हा खेळांचा राजा समजला जातो आणि कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धामध्ये अ‍ॅथलेटिक्स, जलतरण व नेमबाजी हे क्रीडा प्रकार म्हणजे पदकांची लयलूट करण्यासाठी असलेले हुकमी क्रीडा प्रकार म्हणून ओळखले जातात. मात्र या वर्षी झालेल्या राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये भारतीय खेळाडूंची या खेळांमध्ये पीछेहाट दिसून आली. त्या तुलनेत हॉकीत राष्ट्रकुलमधील रौप्यपदक व आशियाई स्पर्धेतील ऐतिहासिक सुवर्णपदकाने भारताला तारले. या सुवर्णपदकामुळे भारताने २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये थेट प्रवेश मिळवण्याची करामत केली. वेटलिफ्टर्सनीही उल्लेखनीय कामगिरी केली.
२०१६ ऑलिम्पिक स्पर्धेच्या दृष्टीने यंदाच्या राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धा भारतासाठी पायाभरणी मानल्या जात होत्या. ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने १५ सुवर्ण, ३० रौप्य व १९ कांस्य अशी एकूण ६४ पदकांची कमाई केली. मात्र गतवेळेच्या तुलनेत भारतीय खेळाडूंनी अ‍ॅथलेटिक्स, जलतरण, नेमबाजी, बॅडमिंटन आदी खेळांमध्ये निराशाजनकच कामगिरी केली. आशियाई स्पर्धेत भारताने यंदा ११ सुवर्ण, ९ रौप्य व ३७ कांस्यपदकांची कमाई केली. गतवेळी भारताला १४ सुवर्ण, १७ रौप्य व ३४ कांस्यपदके मिळाली होती.
राष्ट्रकुल स्पर्धेतील अ‍ॅथलेटिक्समध्ये भारताला केवळ एक सुवर्ण, एक रौप्य व एक कांस्य अशा तीन पदकांवर समाधान मानावे लागले. नवी दिल्लीतील स्पर्धेत वर्चस्व गाजविणाऱ्या अनुभवी खेळाडूंना अ‍ॅथलेटिक्समध्ये आपल्या सर्वोत्तम कामगिरीइतकीही कामगिरी करता आली नाही. आशियाई स्पर्धेतही भारतीय धावपटूंच्या पदरी निराशाच आली. दोन सुवर्ण, तीन रौप्य व आठ कांस्यपदके त्यांनी अ‍ॅथलेटिक्समध्ये मिळविली. गेल्या १०-१२ वर्षांमध्ये आपल्या धावपटूंना परदेशी प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षण, परदेशातील स्पर्धामध्ये सहभाग, परदेशात सराव, भरपूर सवलती व सुविधा असूनही हे धावपटू पदक मिळविण्यासाठी असलेल्या इच्छाशक्तीत कमी  पडतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेतील बॅडमिंटनमध्ये पारुपल्ली कश्यपने एकेरीत सुवर्णपदक मिळविताना ऐतिहासिक कामगिरी केली. यापूर्वी १९८२मध्ये भारताच्या सय्यद मोदीने सोनेरी कामगिरी केली होती. कश्यपचा अपवाद वगळता भारताच्या अन्य खेळाडूंना अपेक्षेइतकी अव्वल दर्जाची कामगिरी करता आलेली नाही. त्यांना आणखी एक रौप्य, दोन कांस्यपदकांवर समाधान मानावे लागले. आशियाई स्पर्धेत केवळ एका कांस्यपदकावर भारताची बोळवण झाली. या खेळाला भरपूर प्रसिद्धी व प्रायोजकत्व मिळत असताना हे चित्र फारसे आशादायक नाही. भारताची दुसरी फळी अधिक मजबूत करण्याची वेळ आता आलेली आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय हॉकीपटूंना पुरुष गटात ऑस्ट्रेलियासारख्या मातब्बर संघाचे आव्हान पेलवता आले नाही. त्यामुळे अंतिम फेरीत त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. आशियाई स्पर्धेत भारताने १६ वर्षांनी पुरुष गटाचे सुवर्णपदक मिळवीत ऑलिम्पिक स्पर्धेतील प्रवेशही निश्चित केला. भारताच्या दृष्टीने ही कामगिरी म्हणजे दुग्धशर्करा योगच होता.
नेमबाजीत राष्ट्रकुल स्पर्धेत एक सुवर्ण, एक रौप्य व सात कांस्यपदके भारताने मिळविली. त्या तुलनेत आशियाई स्पर्धेत भारताने चार सुवर्णपदकांसह १७ पदकांची कमाई केली. तरीही भारतीय खेळाडूंमध्ये पदक मिळविण्यासाठी असलेली क्षमता व कौशल्य लक्षात घेता यापेक्षाही जास्त पदके त्यांना मिळविता आली असती असेच म्हणावे लागेल. सुदैवाने अ‍ॅम्युनिशन, विविध हत्यारे व प्रायोजकत्व याबाबत नेमबाजीत पूर्वीइतकी अडचण येत नाही. कुस्तीत राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पाच सुवर्णपदकांसह १३ पदके लुटली. आशियाई स्पर्धेत भारताने एका सुवर्णपदकासह पाच पदके पटकावली. ही कामगिरी खूपच प्रशंसनीय आहे. या खेळाला आणखी प्रोत्साहन मिळाले तर भारत या खेळात सर्वच स्पर्धामध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवू शकेल. बॉक्सिंगमध्ये आशियाई स्पर्धेतील सरिता देवीचे कांस्यपदक खूपच गाजले. उपांत्य फेरीतील पंचांच्या पक्षपातीपणाबद्दल निषेध म्हणून तिने हे पदक स्वीकारण्यास नकार दिला. तिच्या या अभिनव निषेधामुळे सर्वत्र खळबळ उडाली. तिने नंतर माफी मागितली. त्यामुळे तिची एक वर्षांच्या बंदीवर सुटका झाली. एक मात्र नक्की की, आशियाई स्पर्धासारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धामध्ये पंचांकडून पक्षपातीपणा केला जातो, हे सर्वानाच कळून चुकले. दुर्दैवाने आपल्या खेळाडूंना कोणी ‘गॉडफादर’ नाही हे विदारक सत्य आहे.
भारतीय वेटलिफ्टर्सना पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. दोन्ही स्पर्धामध्ये त्यांची कामगिरी चांगली झाली. राष्ट्रकुलमध्ये तीन सुवर्णपदकांसह एक डझन पदकांची कमाई त्यांनी केली. उत्तेजकाच्या विळख्यातून भारतीय वेटलिफ्टर्स मुक्त होऊ लागले आहेत आणि या खेळाकडे गांभीर्याने पाहत आहेत, याचेच ते द्योतक आहे. स्क्वॉशमध्ये भारतीय खेळाडूंनी लक्षवेधक कामगिरी करीत या खेळातही कारकीर्द घडवता येते हे दाखवून दिले. टेबल टेनिसमध्ये भारताला मर्यादितच यश मिळाले. टेनिसबाबत मैदानावरील कामगिरीपेक्षाही मैदानाबाहेरच आपले खेळाडू अधिक गाजले. भारताच्या स्टार खेळाडूंनी आशियाई स्पर्धेपेक्षा एटीपी स्पर्धाना अधिक महत्त्व दिल्याची चर्चा अधिक रंगली. रिओ ऑलिम्पिकचा विचार केल्यास भारतीय खेळाडूंना सर्वच खेळांबाबत खूप मेहनत करावी लागणार आहे.