डिसेंबरमध्ये होणार असलेल्या वर्ल्ड सीरिज हॉकीच्या दुसऱ्या मोसमाचा कार्यक्रम बदलण्यात आला आहे. भारतीय हॉकी महासंघाच्या विनंतीमुळे कार्यक्रमाचा तारख्या बदलण्यात आल्याचे संयोजकांनी सांगितले. येत्या काही दिवसांत भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकांसह काही महत्त्वपूर्ण बदल घडणार आहेत. देशातील हॉकीच्या कारभाराची सूत्रे भारतीय हॉकी महासंघाकडेच असतील, यासंदर्भात काही महत्त्वपूर्ण निर्णय होणार आहेत. पारदर्शक प्रशासनासाठी नोव्हेंबर अखेरीस भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुका होणार आहेत. याशिवाय भारतीय हॉकी महासंघाची आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाशी असणाऱ्या संलग्नतेवर शिक्कामोर्तब होणार आहे. याद्वारे हॉकी इंडियाची संलग्नता काढून घेण्याबाबतची प्रक्रिया सुरू आहे. त्याचा निर्णय लवकरच अपेक्षित आहे.
वर्ल्ड सीरिज हॉकीशी संबंधित खेळाडू, पदाधिकारी, चाहते यांच्यासाठी अनुकूल वातावरण आम्हाला तयार करायचे आहे. सध्या खेळाच्या निमित्ताने सुरू असलेल्या राजकारणातून हॉकीला बाहेर काढण्याची गरज असल्याचे निंबस स्पोर्ट्सचे अध्यक्ष सुनील मनोचा यांनी सांगितले. वर्ल्ड सीरिज हॉकीच्या आयोजनसाठी दोन तात्पुरत्या तारखांबाबत विचार सुरू आहे. लवकरच यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी पुढे सांगितले.