भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक टेरी वॉल्श यांच्या जाण्यानंतर वाद-विवाद सुरू आहेत, पण असे असले तरी गेल्या दीड वर्षांतील कामगिरी पाहता भारतीय हॉकी मोठय़ा उंचीवर असून संघाचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे मत निवड समिती सदस्य अर्जुन हलप्पा यांनी व्यक्त केले आहे.
‘‘काही गोष्टींवर आमचे नियंत्रण नसते, पण या गोष्टी आम्ही नकारात्मकपणे घेत नाही. गेल्या ११ ते १८ महिन्यांमध्ये भारतीय हॉकी संघाने चांगली झेप घेतली आहे, त्यांच्या कामगिरीमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. या साऱ्या गोष्टींची काळजी प्रशासकांनी घ्यायला हवी आणि याबाबत सकारात्मक विचार होईल,’’ अशी आशा हलप्पा यांनी व्यक्त केली.
संघाच्या विजयाबद्दल हलप्पा म्हणाले की, ‘‘ ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मातीत कसोटी मालिकेत पराभूत करणे ही नक्कीच सोपी गोष्ट नव्हती. या मालिकेत आम्ही त्यांची मक्तेदारी मोडीत काढली. या विजयांमुळे संघ अधिक बलवान होण्यास मदत होईल. या विजयानंतर आम्ही विश्वातील अव्वल संघ झालो, असे म्हणणे चुकीचे ठरेल. अशीच काही यशाची शिखरे पार करत आम्ही अव्वल स्थानावर पोहोचू. कनिष्ठ संघामध्येही चांगली गुवणत्ता आहे, त्यामुळे भारताचे भवितव्य उज्ज्वल आहे.’’
हॉकी इंडिया लीगचाही खेळाडूंना चांगला फायदा होईल, असे हलप्पा यांना वाटते. ‘‘सध्या हॉकी इंडिया लीगमध्ये नावाजलेले खेळाडू खेळत आहेत, त्याचबरोबर त्यांच्या खेळावर साऱ्यांचेच लक्ष असेल. त्यामुळे ही स्पर्धा खेळाडूंसाठी फार महत्त्वाची असेल.’’