सरदारासिंग याच्या नेतृत्वाखालील भारतीय हॉकी संघात सातत्याचा अभाव असून, हीच उणीव त्यांना आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी त्रासदायक ठरणार आहे, असे ऑस्ट्रेलियाचे अव्वल दर्जाचा हॉकीपटू जेमी डायर याने सांगितले.
‘‘भारतीय संघाला गोल नोंदविण्यासाठी रूपींदरपाल सिंग व गुरबाज सिंग यांच्यावर खूपच अवलंबून राहावे लागणार आहे. भारतीय संघाने खेळात प्रगती केली असली तरी अन्य देशांच्या संघांनीही आपल्या खेळात सुधारणा केली आहे. त्यामुळेच आगामी विश्वचषक स्पर्धेत भारताला खूपच झगडावे लागणार आहे,’’ असे डायर याने सांगितले.
तो म्हणाला, ‘‘जगातील सर्वोत्तम संघांमध्ये स्थान मिळविण्याइतकी उंची त्यांनी गाठली असली तरी त्यांच्या खेळात सातत्यपूर्ण कामगिरी आवश्यक आहे. रूपिंदर व गुरबाज यांच्यासारखे बुजूर्ग खेळाडू भारतीय संघात आहेत. त्यांच्याकडून भारतीय संघास मोठय़ा अपेक्षा आहेत.’’
भारतीय संघातील उणिवांविषयी डायर म्हणाला, ‘‘पेनल्टी कॉर्नरचे गोलात रूपांतर करणे व भक्कम बचाव याबाबत भारतीय खेळाडू अजूनही कमी पडतात. केवळ आक्रमक खेळ करूनही विजेतेपद मिळवता येत नाही. त्याला उत्कृष्ट बचावात्मक खेळाचीही जोड आवश्यक असते. यंदाची विश्वचषक स्पर्धा माझ्यासाठी अखेरची स्पर्धा असेल. खेळातून निवृत्त होण्याचा निर्णय मी अद्याप घेतलेला नसला तरी आणखी चार वर्षांनी होणाऱ्या विश्वचषकापूर्वीच मी स्पर्धात्मक हॉकीतून निवृत्त होईन.’’