19 February 2019

News Flash

आठवडय़ाची मुलाखत : संघात स्थान टिकवण्यासाठी प्रचंड चढाओढ

भारतीय पुरुष हॉकी संघाचा चेहरा मागील ४-५ वर्षांत बराच बदलला आहे.

वरुण कुमार, भारतीय हॉकी संघातील खेळाडू

वरुण कुमार, भारतीय हॉकी संघातील खेळाडू 

भारतीय पुरुष हॉकी संघाचा चेहरा मागील ४-५ वर्षांत बराच बदलला आहे. संघात स्थान कायम राखण्यासाठी आणि पटकावण्यासाठी बरीच चढाओढ सुरू आहे. या शर्यतीत तग धरणे हे लक्ष्य ठेवूनच प्रत्येक खेळाडू शंभर टक्के योगदान देत आहे; पण प्रत्येक वेळी यश मिळते असे नाही. राखीव फळीतील खेळाडूही चांगली कामगिरी करण्याची क्षमता राखतात. त्यातच प्रत्येक जण मिळेल त्या स्थानावर खेळण्यास तयार आहे. परिणामी,संघात स्थान मिळवण्यापेक्षा ते टिकवणे अधिक आव्हानात्मक झाले आहे, असे मत भारतीय संघातील बचावपटू वरुण कुमारने व्यक्त केले. कनिष्ठ विश्वचषक विजेत्या, आशियाई विजेत्या आणि जागतिक हॉकी लीग कांस्यपदक विजेत्या भारतीय संघातील सदस्य असलेला हा खेळाडू अन्य मातब्बर खेळाडूंशी स्पर्धा करत संघातील स्थान टिकवण्यासाठी प्रयत्नशील आहे. बॉम्बे सुवर्णचषक अखिल भारतीय हॉकी स्पर्धेदरम्यान त्याच्याशी केलेली बातचीत-

कनिष्ठ विश्वचषक स्पर्धा ते जागतिक हॉकी लीग या दोन वर्षांच्या प्रवासाबद्दल काय सांगशील?

२०१४ ला जेव्हा आमचे सराव शिबीर सुरू झाले तेव्हा प्रशिक्षकांनी विश्वचषक जिंकण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवण्यास सांगितले होते. त्या दृष्टीने त्यांनी आमच्याकडून सराव करून घेतला. त्यामुळे २०१४ ते २०१६ या दरम्यान होणाऱ्या स्पर्धामध्ये आम्ही सतत प्रयोग करत राहिलो. विश्वचषक हाच आमच्या डोळ्यासमोर होता. त्यामुळे या स्पर्धामधील निकालापेक्षा संघाच्या आणि खेळाडूंच्या कामगिरीवर अधिक भर दिला. जय-पराजयातून शिकत गेलो. एकमेकांना साहाय्य केले आणि त्याचेच फलित म्हणून आम्ही विश्वचषक जिंकलो. हे जेतेपद सुखावह होते. हा दोन वर्षांचा प्रवास माझ्यासाठी चढ-उतारांचा राहिला. कनिष्ठ विश्वविजेतेपदानंतर संघातून वगळण्यात आले आणि त्यानंतर अचानक वरिष्ठ संघात बोलावणे, या दोन्ही घटना अनपेक्षित होत्या.

आशियाई संघासाठी निवडण्यात आलेल्या संघात तुला संधी मिळेल, असे वाटले होते का?

कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेनंतर वरिष्ठ संघात संधी मिळेल, असे वाटले नव्हते; पण उशिरा संधी मिळाल्याने माझाच फायदा झाला, असे मी म्हणेन. कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेनंतर अचानक संघातून वगळल्यामुळे मी आत्मचिंतन केले. माझ्यातील उणिवा शोधण्यावर आणि त्यात सुधारणा करण्यासाठी मी मेहनत घेतली. अचानक झालेल्या निवडीकडे मी दुसरी संधी म्हणून पाहिले आणि सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला.

संघातून वगळल्यानंतर आलेल्या नैराश्यावर कशी मात केलीस?

दडपण प्रत्येकाला असते. त्याशिवाय आयुष्य नाही. संघातून वगळल्यानंतर निराश झालो होतो; पण त्या परिस्थितीकडे मी सकारात्मक दृष्टीने पाहिले. घरच्यांकडूनही मानसिक आधार मिळाला. मात्र संघाबाहेर असल्याबद्दल अनेक जण हिणवायचे. त्याचे खूप वाईट वाटायचे; त्या परिस्थितीवर मात करत पुन्हा नव्या निर्धाराने उभा राहिलो. कदाचित प्रबळ इच्छाशक्तीमुळेच अचानक वरिष्ठ संघासाठी माझी निवड झाली असावी. वरिष्ठ संघात खेळण्याचे प्रचंड दडपण होते. मात्र सर्व वरिष्ठ खेळाडूंनी मला ते जाणवू दिले नाही.

बचावातील ढिसाळपणा ही नेहमीच भारताची डोकेदुखी ठरली आहे?

हे कमी-अधिक प्रमाणात खरे आहे; पण आपला बचाव भक्कम आहे. काही वेळेला डावपेच फसतात आणि प्रतिस्पर्धी खेळाडूला गोल करण्याची संधी मिळते. मात्र, याचा अर्थ आपला बचाव कमकुवत आह,े असा होत नाही. काही त्रुटी आहेत आणि प्रशिक्षक शॉर्ड मरीन त्याचा गांभीर्याने विचार करीत आहेत.

संघातील स्थान टिकवणे किती आव्हानात्मक झाले आहे?

वरिष्ठ संघात स्थान टिकवणे, प्रचंड आव्हानात्मक झाले आहे. कोणत्याही स्थानावर खेळायला खेळाडूंची तयारी आहे. बचाव फळीत मोठी  स्पर्धा आहे. रुपिंदरपाल, प्रदीप मोर, सुरेंदर, हरमनप्रीत, सरदार हे सगळे माझ्यापेक्षा सरस खेळाडू आहेत. त्यांच्यातच मोठी स्पर्धा आहे. त्यामुळे मला स्वत:चे स्थान निर्माण करणे किती कठीण आहे, याची कल्पना येईल; पण यापलीकडे त्यांच्याकडून खूप शिकायला मिळते. हॉकीतले अनेक बारकावे आत्मसात करायला मिळतात.

भारतीय हॉकीचा मागील ४-५ वर्षांत बदललेला चेहरा आणि वाढलेली आव्हाने याकडे तू कसा पाहतोस?

पूर्वी हॉकीत आपली मक्तेदारी होती. कालांतराने ती आपण गमावली; पण मागील काही वर्षांचा खेळ पाहता आपण पुन्हा मुसंडी मारू, असा विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्व खेळाडूंवरील जबाबदारी आणखी वाढली आणि त्यामुळे अंतर्गत स्पर्धाही वाढली. खेळाच्या विकासासाठी ती फार महत्त्वाची आहे. माझ्या बाबतीत बोलायचे तर संघात स्थान टिकवणे आणि मिळालेल्या संधीचे सोने करणे, याला माझे प्राधान्य आहे. आशियाई स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा आणि वरिष्ठ विश्वचषक हे लक्ष्य खेळाडूंनी ठेवले आहे. त्या दिशेने आमची वाटचालही सुरू आहे.

First Published on December 25, 2017 2:26 am

Web Title: indian hockey player varun kumar interview in loksatta