16 December 2017

News Flash

हॉकीच्या युवराजाची घरासाठी वणवण!

आश्वासन देऊनही सरकारने घर दिलं नाही - युवराज वाल्मिकी

लोकसत्ता टीम | Updated: September 12, 2017 4:25 PM

युवराज वाल्मिकी ( संग्रहीत छायाचित्र )

भारतात क्रिकेटचा अपवाद सोडता अन्य क्रिडापटूंना प्रशासन आणि सरकारच्या अनास्थेचा सामना करावा लागला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईचा हॉकीपटू युवराज वाल्मिकीनेही ट्विट करुन सरकारी अनास्थेचा आपण कसा बळी पडलो याची कहाणीच सांगितली.

युवराज आणि देवेंद्र वाल्मिकी हे भारतीय हॉकी संघातले दोन महत्वाचे खेळाडू. सख्खे भाऊ असलेल्या दोघांनीही आतापर्यंत अनेक महत्वाच्या स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. २०१४ साली भारताच्या विश्वचषक संघात युवराज वाल्मिकी भारतासाठी खेळला होता. यानंतर दिल्ली वेवरायडर्स या संघाकडून खेळताना युवराजने आपल्या संघाला हॉ़कीलिग स्पर्धेचं विजेतेपद मिळवून दिलं होतं. युवराजचा भाऊ देवेंद्र वाल्मिकी मागच्या वर्षी रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाकडून हॉकी खेळला होता. मात्र या दोन्ही बंधूंचे मुंबईतले सुरुवातीचे दिवस काही चांगले नव्हते. मुंबईतल्या एका गॅरेजमध्ये वाल्मिकी कुटुंब रहायचं. सुरुवातीच्या दिवसांत युवराज राहत असलेल्या मुंबईच्या घरात वीजही नव्हती. मात्र यानंतर माजी खेळाडू धनराज पिल्ले आणि अन्य खेळाडूंनी मदत केल्यानंतर युवराजला मुंबईत तात्पुरत घर मिळालं.

युवराजने भारतासाठी हॉकीत केलेली कामगिरी पाहता, सहा वर्षांपूर्वी महाराष्ट्र सरकारने त्याला मुंबईत घर देण्याचं आश्वासन दिलं. मात्र अद्यापही सरकारने आपलं आश्वासन पाळलेलं नाहीये.

आतापर्यंत ६० हून अधिक सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलेल्या युवराजने आपल्याला देण्यात आलेलं आश्वासन पूर्ण झालं नसल्याची खंत बोलून दाखवली. यावेळी युवराजने लोकांनीही या प्रकरणात आपली मदत करावी असं आवाहन केलं आहे.

ज्यावेळी प्रशासनाने मला घर देण्याचं आश्वासन दिलं. त्यावेळी माझ्यासाठी तो एक आशेचा किरण होता. मात्र आता सहा वर्षांचा कालावधी उलटून गेल्यानंतर अजुनही मला घर मिळालेलं नाहीये. सध्या युवराज भारतीय संघाच्या बाहेर आहे. मात्र राष्ट्रीय स्पर्धा आणि जर्मन लीग स्पर्धेत युवराज हॉकी खेळतोय. त्यामुळे युवराजची घरासाठी सुरु असलेली वणवण संपते का, हे पाहावं लागणार आहे.

First Published on September 12, 2017 4:25 pm

Web Title: indian hockey player yuvraj walmiki takes twitter to express his disappointment that he still didint get home from government