नवी दिल्ली : करोनाच्या टाळेबंदीमुळे तीन महिने बेंगळूरुच्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साइ) केंद्रात अडकलेल्या भारताच्या हॉकीपटूंना अखेर एका महिन्यासाठी घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. हॉकी इंडियाकडून ही परवानगी भारताच्या महिला आणि पुरुष हॉकी खेळाडूंना मिळाली आहे.‘‘खेळाडूंना सध्या विश्रांती गरजेची आहे. त्यांना थोडे दिवस त्यांच्या कुटुंबीयांसोबत घालवता यावेत म्हणून महिनाभर घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. खेळाडूंना घरी पाठवण्यात आले असले तरी त्यांना सरकारच्या आदेशाप्रमाणे गर्दीमध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. खेळाडूंना जास्त काळ घरी थांबण्याचेच आदेश देण्यात आले आहेत,’’ असे हॉकी इंडियाचे अध्यक्ष मोहम्मद मुश्ताक अहमद यांनी स्पष्ट केले. मुंबईचा असलेला गोलरक्षक सूरज करकेरा हा मात्र बेंगळूरुतच थांबला आहे.