विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३-१ अशी कसोटी मालिका जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचे येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. खेळाडूंच्या चाहत्यांबरोबरच हॉकी इंडियाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
सरदारा सिंग याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिल्या कसोटीत पराभव स्वीकारला, मात्र त्यानंतर त्यांनी सलग तीन सामने जिंकून मालिकेत शानदार विजय मिळविला. विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधताना सरदारा सिंग म्हणाला, ‘‘या मालिकेत आमच्या खेळाडूंनी अतिशय कौतुकास्पद खेळ केला. सर्वच आघाडय़ांवर आमच्या खेळाडूंनी खूपच प्रगत खेळ केला. त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दोनशेवा सामना खेळण्याची कामगिरी मी याच दौऱ्यात पूर्ण केली आणि खेळाडूंनी मालिका विजयाची मला भेट दिल्यामुळे मला आणखीनच मोठे समाधान मिळवून दिले आहे.’’
तो म्हणाला, ‘‘आगामी चॅम्पियन्स चषक स्पर्धेसाठी या मालिकेतील अनुभव आमच्या खेळाडूंना फायदेशीर होणार आहे. चॅम्पियन्स चषक स्पर्धेत आम्ही अव्वल दर्जाचे यश मिळवू अशी मला खात्री आहे.’’
भुवनेश्वर येथे ६ ते १४ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या चॅम्पियन्स स्पर्धेत भारताची पहिली लढत जर्मनीबरोबर होईल.