भुवनेश्वर येथे होणाऱ्या चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघात आक्रमक फळीतील खेळाडू गुरविंदर सिंग व चिंगलेनासिंग कंगुजाम यांच्या ऐवजी ललित उपाध्याय व एस. के. उथप्पा यांना स्थान देण्यात आले आहे. ही स्पर्धा ६ ते १४ डिसेंबर दरम्यान होत आहे.
मेजर ध्यानचंद स्टेडियमवर नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय चाचणीतील कामगिरीच्या आधारे भारतीय संघाची निवड करण्यात आली. आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या संघातील चंडी व चिंगलेना यांना मात्र चॅम्पियन्स स्पर्धेसाठी स्थान मिळू शकले नाही. याच संघातील आकाशदीप सिंग हा छोटय़ाशा दुखापतीमुळे चाचणीत सहभागी झाला नाही. तथापि, त्यालाही संघात स्थान देण्यात आले आहे. स्पर्धेपूर्वी तो तंदुरुस्त होईल अशी अपेक्षा आहे. उपाध्याय व उथप्पा यांच्याबरोबरच हरज्योत सिंग व गुरजिंदर सिंग यांनाही या संघात स्थान मिळाले आहे.
भारतीय संघाचे नेतृत्व सरदारा सिंग करीत असून गोलरक्षक पी. आर. श्रीजेश याच्याकडे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात सहा डिसेंबर रोजी जर्मनीशी गाठ पडणार आहे. त्यानंतर त्यांना अर्जेटिना (७ डिसेंबर) व नेदरलँड्स (९ डिसेंबर) यांच्याशी खेळावे लागणार आहे.
भारतीय संघ
गोलरक्षक : पी.आर.श्रीजेश (उपकर्णधार), हरज्योत सिंग. बचावरक्षक : रुपींदरपाल सिंग, व्ही.आर.रघुनाथ, बीरेंद्र लाक्रा, कोठाजित सिंग, गुरबाज सिंग, गुरजिंदर सिंग. मध्यरक्षक : मनप्रित सिंग, सरदारा सिंग, धरमवीर सिंग, दानिश मुजताबा, एस.के.उथप्पा. आघाडी फळी : रमणदीप सिंग, एस.व्ही.सुनील, आकाशदीप सिंग, निक्कीन थिमय्या, ललित उपाध्याय.