News Flash

भारतीय हॉकीची शानदार वाटचाल

जागतिक स्तरावर कोणे एके काळी भारतीय हॉकी संघाचे सुवर्णयुग नांदत होते.

भुवनेश्वर येथे नुकत्याच झालेल्या जागतिक लीगमध्ये जर्मनीसारख्या बलाढय़ संघाला हरवून कांस्यपदकावर आपले नाव कोरत भारताने अपेक्षा उंचावल्या आहेत.

जागतिक स्तरावर कोणे एके काळी भारतीय हॉकी संघाचे सुवर्णयुग नांदत होते. मध्यंतरीच्या काळात भारतीय हॉकीची स्थिती खूपच विदारक झाली होती. तथापि आता पुन्हा सुवर्णयुग निर्माण करण्याच्या दिशेने भारतीय हॉकी संघाची वाटचाल सुरू झाली आहे, असे म्हटले तर ते फारसे वावगे ठरणार नाही. भुवनेश्वर येथे नुकत्याच झालेल्या जागतिक लीगमध्ये कांस्यपदकावर पुन्हा आपले नाव कोरत भारताने अपेक्षा उंचावल्या आहेत.

जागतिक लीगमधील हा अंतिम टप्पा होता. जगातील सर्वोत्तम आठ संघांमध्ये हा टप्पा आयोजित करण्यात आला होता. प्राथमिक फेरी, उपांत्य फेरी व अंतिम फेरी अशा टप्प्याने ही स्पर्धा घेण्यात आली होती. प्रत्येक फेरीत चमकदार व सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या भारताने अंतिम टप्प्याबाबत अपेक्षा उंचावल्या होत्या. त्यातही नुकत्याच झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील विजेतेपदानंतर भारतीय खेळाडू अंतिम टप्प्यात किमान कांस्यपदक मिळविणार अशी खात्री निर्माण झाली होती. घरचे मैदान, अनुकूल वातावरण, प्रेक्षकांचा पाठिंबा आदी सर्व गोष्टींचा भारताला फायदा मिळाला. असे असले तरी या स्पर्धेत ऑस्ट्रेलियासारख्या हॉकी सम्राटांना पहिल्याच लढतीत बरोबरीत ठेवण्याची किमया त्यांनी दाखविली हीदेखील भारतीय संघाच्या दृष्टीने विजेतेपद मिळविण्यासारखीच कामगिरी होती.

हॉकी इंडियाच्या स्थापनेनंतर भारतीय हॉकीत कमालीचा बदल झाला आहे. संघटना स्तरावर सकारात्मक पावले उचलण्यात आली आहेत. भारतीय संघटक व परदेशी प्रशिक्षक यांचे फारसे सूर जमत नाहीत हे त्रिवार सत्य असले तरीही प्रत्येक परदेशी प्रशिक्षकाने काही चांगले बदल घडवून आणले आहेत. रोलँन्ट ओल्टमन्स यांच्याकडे उच्च कामगिरी संचालकपदाची पूर्णवेळ जबाबदारी दिल्यानंतर त्यांनी खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा होण्यासाठी अनेक योजना अमलात आणल्या. त्यामुळेच गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये भारतीय पुरुष व महिला संघांनी कनिष्ठ व वरिष्ठ स्तरावरील अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये अव्वल दर्जाची कामगिरी केली आहे.

आशियाई अजिंक्यपद स्पर्धेपूर्वी हॉकी इंडियाने ओल्टमन्स यांना पदावरून दूर करीत भारतीय पुरुष संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी शोर्ड मरीन यांची नियुक्ती केली. मरीन हे भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक म्हणून काम करीत होते. त्यांच्या जागी  हरेंद्रिंसग यांच्याकडे महिला संघाची जबाबदारी देण्यात आली.

मरीन यांच्यासाठी आशियाई अजिंक्यपद स्पर्धा ही पहिली परीक्षा होती. त्यांनी संघातील प्रत्येक खेळाडूमधील क्षमता, कौशल्य व सहकाऱ्यांबरोबर संवाद साधण्याची शैली कशी आहे हे पाहून त्यानुसार त्यांच्यात सुधारणा करण्यावर भर दिला. आशियाई स्तरावरही भारतीय संघापुढे चीन, जपान, मलेशिया, दक्षिण कोरिया, पाकिस्तान आदी संघांचे आव्हान होते. या आव्हानास पुरून भारतीय खेळाडूंनी सातत्यपणास कल्पकतेची जोड दिली. त्यामुळेच आशियाई स्तरावर भारतास सुवर्णपदकजिंकता आले. हे सुवर्णपदक जागतिक लीगसाठी प्रेरणादायक होते. त्याचप्रमाणे हे यश काही चमत्कार नाही हे दाखविण्याचीही संधी भारताला जागतिक लीगद्वारे मिळाली होती.

जागतिक लीगमध्ये भारताला आघाडीचे स्थान मिळविता आले नाही. इंग्लंड व जर्मनीविरुद्ध त्यांना पराभव स्वीकारावा लागला. साखळी गटात या दोन संघांप्रमाणेच ऑस्ट्रेलियाविरुद्धही भारतास विजय मिळविता आला असता. मात्र पेनल्टी कॉर्नरचे गोलात रूपांतर करण्याबाबत त्यांचा कमकुवतपणा दिसून आला. अनेक वेळा त्यांनी गोल करण्याच्या संधी वाया घालविल्या. तसेच बचाव फळीतील खेळाडूंची अपेक्षेइतकी कामगिरी झाली नाही. ऐन मोक्याच्या क्षणी त्यांनी प्रतिस्पर्धी खेळाडूंना खेळावर नियंत्रण मिळवून दिले. शेवटच्या पाच-सहा मिनिटांमध्ये त्यांच्या खेळात विस्कळीतपणा दिसून आला. तथापि उपांत्यपूर्व फेरीपासून पुन्हा भारतीय खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा झाली. बेल्जियमविरुद्ध पूर्ण वेळेत बरोबरी झाल्यानंतर पेनल्टी शूटआऊटच्या वेळी भारताने सडन डेथद्वारा विजय मिळविला. भक्कम गोलरक्षण, गोल करण्याबाबतची अचूकता यामुळेच भारतास हा विजय मिळविता आला. उपांत्य फेरीत भारताला अर्जेन्टिनाविरुद्ध निसटता पराभव स्वीकारावा लागला. साखळी गटातील सामन्यांच्या वेळी झालेल्या अक्षम्य चुकांचीच पुनरावृत्ती या सामन्यात पाहावयास मिळाली. शेवटच्या दहा मिनिटांमध्ये भारतीय खेळाडूंकडेच खेळाचे नियंत्रण होते. मात्र सांघिक कौशल्य व गोल करण्याची अचूकता याबाबत भारतीय खेळाडू कमी पडले. अन्यथा हा सामना भारताला जिंकताही आला असता. प्रतिस्पर्धी खेळाडूंचे फाऊल कसे होईल याबाबतच्या शैलीतही त्यांच्या मर्यादा दिसून आल्या.

कांस्यपदकासाठी भारताला जर्मनीबरोबर झुंजावे लागणार होते. जर्मनी संघाने जागतिक व ऑलिम्पिक स्पर्धामध्ये अनेक वेळा अव्वल कामगिरी केली आहे. हे लक्षात घेतल्यास त्यांच्याविरुद्ध भारताने मिळविलेला विजय भावी काळासाठी आत्मविश्वास वाढविणारा आहे. पुढच्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धा, विश्वचषक स्पर्धा आदी महत्त्वपूर्ण स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धामध्ये पदक मिळविण्यासाठी भारताची कसोटी ठरणार आहे. विश्वचषक स्पर्धा पुन्हा भुवनेश्वर येथेच आयोजित केल्या जाणार असल्यामुळे ही स्पर्धा भारतासाठी अत्यंत प्रतिष्ठेची असणार आहे. संयोजक-पदाबरोबरच विजेतेपद मिळविण्यासाठी भारतीय खेळाडूंना सर्वोच्च कौशल्य दाखवावे लागणार आहे. जागतिक लीग ही भारताच्या दृष्टीने विश्वचषकाची रंगीत तालीम होती. पावसाचा व्यत्यय असूनही भारताने लीगचे यशस्वी आयोजन केले. प्रेक्षकांचाही भरघोस प्रतिसाद लाभला होता.

सरदारसिंग याच्यासह काही ज्येष्ठ खेळाडूंना संघाबाहेर ठेवूनही भारताने जागतिक लीगचे कांस्यपदक मिळविले आहे. संघात आपले स्थान अबाधित आहे असे कोणीही समजू नये हेच भारतीय संघाचे प्रशिक्षक मरीन यांनी दाखवून दिले आहे. जागतिक लीगच्या वेळी त्यांनी काही युवा खेळाडूंना संधी दिली होती. भावी काळासाठी संघबांधणी हाच त्यामागचा हेतू होता. त्यांचा हा हेतू साध्य झाला आहे. भारतीय संघाने विश्वचषक व ऑलिम्पिक स्पर्धाची पात्रता पूर्ण केली आहे. या दोन्ही स्पर्धाकरिता सरावाचे नियोजन करण्यासाठी संघटकांना भरपूर अवधी आहे. आशियाई अजिंक्यपद व जागतिक लीग या दोन्ही स्पर्धामध्ये भारतीय खेळाडूंमध्ये दिसून आलेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळण्यावर सराव शिबिरांमध्ये भर देण्याची आवश्यकता आहे. या चुका टाळल्या तर भारतीय संघाला जागतिक स्तरावर सोनेरी कामगिरी करता येईल.
मिलिंद ढमढेरे – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2017 1:03 am

Web Title: indian hockey success path
Next Stories
1 क्रिकेटचा ‘पंच’नामा
2 धोनीच्या ‘लाईक’ला चाहत्यांनी केलं अनलाईक
3 माझ्याकडे धोनी- ख्रिस गेल एवढी ताकद नाही: रोहित शर्मा
Just Now!
X