विश्वचषक हॉकी स्पध्रेतील भारताचे स्थान आता जवळपास निश्चित झाले आहे. परंतु जागतिक हॉकीमधील हे महत्त्वाचे स्थान पक्के करण्यासाठी भारताला आशिया चषक हॉकी स्पर्धा जिंकण्याची नितांत आवश्यकता आहे. आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ रविवारी गतविजेत्या दक्षिण कोरियाशी भिडणार आहे.
नेदरलँड्समध्ये होणाऱ्या विश्वचषक हॉकी स्पध्रेसाठी भारत व मलेशिया हे दोन्ही संघ जवळपास पात्र ठरले आहेत. शुक्रवारी दक्षिण कोरियाने पहिल्या उपांत्य सामन्यात २-१ असा विजय मिळवल्याने पाकिस्तानचे विश्वचषकाचे स्वप्न भंगले. आशिया चषक जिंकला असता तरच पाकिस्तानला विश्वचषकाला पात्र ठरता आले असते. कोरियाचा संघ आधीच या पात्र ठरला आहे. नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या ओसियानिया चषक स्पध्रेनंतर आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाकडून विश्चषकातील स्थानांबाबत अधिकृत स्पष्टीकरण होईल. पण सरदार सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला तोपर्यंत वाट पाहण्याची अजिबात इच्छा नाही. दक्षिण कोरियाला हरवून विश्वचषकाचे तिकीट थेट नक्की करण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे.

अंतिम फेरीपर्यंतचा भारताचा प्रवास
साखळी        
विजयी वि. ओमान ८-०    
विजयी वि. दक्षिण कोरिया २-०
विजयी वि. बांगलादेश ९-१
उपांत्य फेरी
विजयी वि. मलेशिया २-०

आशिया चषक हॉकीमधील कामगिरी
    भारत    दक्षिण कोरिया
विजेतेपद    २००३, २००७    १९९३, १९९९, २००९
उपविजेतेपद    १९८२, १९८५, १९८९, १९९३    २००७