भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंगला विश्वास

नवी दिल्ली : दोन वर्षांपूर्वी मायदेशात झालेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताला उपांत्यपूर्व फेरीतच गाशा गुंडाळावा लागला असला तरी आगामी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारत नक्कीच पदक जिंकेल, असा आशावाद कर्णधार मनप्रीत सिंगने व्यक्त केला.

२०१८ मध्ये भुवनेश्वरला झालेल्या विश्वचषकात भारताला नेदरलॅण्ड्सविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला. मात्र नोव्हेंबर महिन्यात भारताने रशियाला धूळ चारून ऑलिम्पिकमधील स्थान केले. प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या पुरुष संघाने भरारी घेतली आहे.

‘‘२०१९ हे वर्ष भारतासाठी फार चांगले ठरले. वर्षांच्या सुरुवातीला आम्ही पाचव्या क्रमांकावर होतो. ते स्थान कायम राखण्यात यश मिळवले. टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचे आमचे मुख्य लक्ष्य होते. ते आम्ही साध्य केले. आता ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठून पदकही जिंकून दाखवू,’’ असे मनप्रीत १८ जानेवारीपासून रंगणाऱ्या प्रो हॉकी लीगनिमित्त आयोजित खास कार्यक्रमात म्हणाला.

‘‘आताचे आमचे पाचवे स्थान पाहता अंतिम फेरी गाठणे आमच्यासाठी अशक्यदेखील नाही. मात्र अर्थातच त्यासाठी सातत्य गरजेचे आहे. कारण गेल्या संपूर्ण वर्षांमध्ये आम्ही सातत्याने खेळ केला,’’ असेही मनप्रीतने सांगितले.

मिडफिल्डर मनप्रीतने आगामी आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या (एफआयएच) प्रो हॉकी लीग स्पर्धेतील कामगिरीच्या धर्तीवर ऑलिम्पिकमधील कामगिरीचा अंदाज बांधता येईल, असेही म्हटले. प्रो हॉकी लीगमध्ये हॉलंड, बेल्जियम आणि ऑस्ट्रेलिया या बलाढय़ संघांचा समावेश आहे.  ते पाहता ऑलिम्पिकपूर्वी या देशांशी दोत हात करण्याची संधी भारताला आहे. प्रो हॉकी लीगमध्ये भारताची सलामीची लढत १८ आणि १९ जानेवारीला हॉलंडविरुद्ध रंगणार आहे.

युवा खेळाडूंची चमकदार कामगिरी!

मनप्रीत सिंगने भारताच्या युवा खेळाडूंचे विशेषकरून कौतुक केले. ‘‘२०१९ मध्ये काही युवा हॉकीपटूंनी भारताच्या वरिष्ठ संघात स्थान मिळवले आहे. त्यांनी त्यांची गुणवत्ता दाखवत आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावी कामगिरी केली आहे. इतकेच नाही तर या युवा हॉकीपटूंनी संघातील वरिष्ठ खेळाडूंची जागादेखील घेतली आहे,’’ असे मनप्रीतने सांगितले.

प्रो-हॉकी लीगमध्ये ९ संघांचा समावेश

प्रो-हॉकी लीग १८ जानेवारी ते २८ जून या कालावधीत खेळण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, नेदरलॅँड, अर्जेटिना, भारत, जर्मनी, ग्रेट ब्रिटन, स्पेन, न्यूझीलंड हे ९ संघ सहभागी होणार आहेत. भारतातील प्रो-हॉकी लीगच्या लढती भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियमवर होणार आहेत.