नवी दिल्ली : बर्मिगहॅम येथे पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय हॉकी संघ सहभागी होणार नाही. २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रतेचा दर्जा लाभलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कामगिरी उंचावण्यासाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी शुक्रवारी सांगितले.

राष्ट्रकुल स्पर्धेनंतर ३५ दिवसांनी आशियाई क्रीडा स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला जाईल, असे आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे प्रमुख बत्रा यांनी सांगितले. त्यांनी यासंदर्भात भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे (साइ) महासंचालक संदीप प्रधान यांच्याशीही चर्चा केली आहे. बर्मिगहॅम राष्ट्रकुल स्पर्धा २८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत होणार आहेत, तर आशियाई क्रीडा स्पर्धा १० ते २५ सप्टेंबर या दरम्यान हँगझोऊ (चीन) येथे होणार आहेत.