न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय हॉकी संघाने आपल्या चौरंगी मालिकेतील दुसऱ्या टप्प्याची सुरुवात सकारात्मक केलेली आहे. आज यजमान न्यूझीलंडविरुद्ध खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारताने ३-२ असा विजय संपादन केला. या दौऱ्यातील पहिल्या टप्प्यामध्ये भारतीय संघाने चांगली कामगिरी केली होती. भारताने जपान आणि न्यूझीलंडला पराभवाचे धक्के दिले होते, मात्र बेल्जियमविरुद्ध त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

आज खेळवल्या गेलेल्या सामन्यात भारताने सुरुवातीपासून आक्रमक सुरुवात केली होती. या आक्रमक खेळाचा फायदा भारताला पहिल्या सत्रात सातव्या मिनीटाला झाला. ललित उपाध्यायने मिळालेल्या संधीचा फायदा उचलत चेंडू गोलपोस्टमध्ये ढकलत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. या धक्क्याने न्यूझीलंडचा संघ काहीसा भांबावून गेला. यानंतर न्यूझीलंडने भारताच्या गोटात शिरुन गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले, मात्र भारतीय बचावपटूंपुढे त्यांची डाळ शिजू शकली नाही. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला न्यूझीलंडला पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याच्या दोन संधी मिळाल्या, मात्र भारतीय गोलरक्षक पी.आर.श्रीजेशने त्यांचे मनसुबे पुन्हा उधळून लावले.

अखेर २३ व्या मिनीटाला न्यूझीलंडने पहिल्यांदा गोलचं खातं उघडलं. डॅनिअल हॅरिसने भारताच्या बचावपटूंना चकवत सुरेख मैदानी गोल केला. यादरम्यान सामन्यात १-१ अशी आघाडी घेतल्यानंतर न्यूझीलंडच्या संघाला पेनल्टी कॉर्नवरल गोल करण्याच्या अनेक संधी आल्या होत्या, मात्र श्रीजेशच्या बचावापुढे त्यांचे सर्व प्रयत्न फोल ठरले. यानंतर मध्यांतरानंतर ३१ व्या मिनीटाला हरजित सिंहने पेनल्टी कॉर्नवर गोल करत भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर लागोपाठ ३६ व्या मिनीटाला रुपिंदरपाल सिंहने पेनल्टी कॉर्नवर गोल करत भारताची आघाडी ३-१ अशी वाढवली.

यानंतर ३७ व्या मिनीटाला न्यूझीलंडकडून केन रसेलने पुन्हा एकदा मैदानी गोल करत यजमान संघाची आघाडी ३-२ अशी कमी केली. यानंतर न्यूझीलंड संघाने सामन्यात अनेकदा पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय बचावपटूंच्या भक्कम बचावापुढे त्यांची डाळ शिजू शकली नाही. अखेर सामना संपताना भारताने ३-२ या फरकाने सामन्यात बाजी मारली.