हेग (नेदरलँड) येथे ३१ मेपासून सुरू होणाऱ्या पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ चांगली कामगिरी करण्याबाबत आशावादी आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक टेरी वॉल्श व कर्णधार सरदारा सिंग यांनी नेत्रदीपक यशाचा विश्वास व्यक्त केला.
‘‘गेले दहा दिवस भारतीय संघातील खेळाडूंनी अतिशय एकाग्रतेने सराव केला आहे. संघातील अनेक कच्चे दुवे बाजूला सारण्यावर या शिबिरात भर दिला होता. संघात अनेक गुणवान खेळाडू असून ते या स्पर्धेत अनपेक्षित कामगिरी करतील अशी मला खात्री आहे. सराव शिबिराला सचिन तेंडुलकरची लाभलेली उपस्थिती प्रेरणादायी ठरणार आहे,’’ असे वॉल्श म्हणाले. ‘अ’ गटात भारताला बेल्जियम (३१ मे), इंग्लंड (२ जून), स्पेन (५ जून), मलेशिया (७ जून) व ऑस्ट्रेलिया (९ जून) यांच्याशी खेळावे लागेल.