‘‘पुढील वर्षी होणाऱ्या रिओ ऑलिम्पिक स्पध्रेत सुसंघटित बचाव हेच भारतीय पुरुष हॉकी संघाच्या यशाचे मुख्य सूत्र असेल,’’ असे मत संघाचे मुख्य प्रशिक्षक रोलँट ओल्टमन्स यांनी व्यक्त केले.
पॉल व्हॅन अ‍ॅस यांच्या हकालपट्टीनंतर ओल्टमन्स यांच्यावर प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. ओल्टमन्स उच्च कामगिरी संचालक आणि प्रशिक्षक अशा दुहेरी भूमिकेत आहेत. ते म्हणाले, ‘‘संघटित बचाव अत्यंत महत्त्वाचा आहे. तुमचा बचाव संघटित असेल, तर आत्मविश्वासाने तुम्ही आक्रमण करू शकता. बचावात त्रुटी असल्यास आक्रमण करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.’’
न्यूझीलंडविरुद्धच्या हॉकी मालिकेला जाण्यापूर्वी २७ सप्टेंबपर्यंत भारतीय संघाचे येथे सराव शिबीर आयोजित करण्यात आले आहे. भारताला कोणत्या बाबींवर सुधारणा करायला हवी, या प्रश्नावर ते म्हणाले, ‘‘परिस्थितीनुसार खेळ करण्यासाठी भारताला आक्रमक आणि प्रतिस्पर्धी संघाला अंदाज बांधता येणार नाही, असा खेळ करायला हवा. आक्रमणात सुधारणा करण्यास वाव आहे.’’