भारतीय हॉकी संघ सज्ज

सराव सामन्यांतील दमदार विजयांमुळे आत्मविश्वास दुणावलेला भारतीय संघ मंगळवारी नेल्सन येथे होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या हॉकी कसोटी सामन्यासाठी सज्ज झाला आहे.

घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा न्यूझीलंड संघाला मिळेल, तर न्यूझीलंड ‘अ’ संघाविरुद्धच्या दोन सराव सामन्यांतील विजय भारताच्या गाठीशी आहेत. विजयासाठी उत्सुक असलेल्या भारतीय संघाला सुरुवातीच्या काही मिनिटांत गोल साकारण्याचे महत्त्व समजले आहे. एस. के उथप्पा, आकाशदीप सिंग आणि एस. व्ही. सुनील यांच्यावर भारतीय संघाची मदार असेल. ‘‘दोन सराव सामन्यांतून बरेच काही आम्हाला शिकायला मिळाले आहे. याचप्रमाणे न्यूझीलंडमधील वातावरणाशी आम्ही जुळवूनही घेतले आहे,’’ असे भारताचे मुख्य प्रशिक्षक आणि उच्च कामगिरी संचालक रोलँट ओल्टमॅन्स यांनी सांगितले.