अझलन शाह हॉकी स्पर्धा

गेल्या वर्षी भुवनेश्वर येथे झालेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेतील पराभवातून बोध घेत मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष हॉकी संघ आता मलेशिया येथे रंगणाऱ्या अझलन शाह हॉकी स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. या स्पर्धेत दमदार कामगिरी करण्याचे लक्ष भारतीय हॉकी संघाने ठेवले आहे.

भारताचा पहिला सामना २३ मार्च रोजी जपानविरुद्ध होणार असून या स्पर्धेसाठी भारतीय संघ रविवारी रात्री मलेशियाला रवाना झाला. या वेळी मनप्रीत म्हणाला की, ‘‘इपोहसारख्या उष्ण आणि दमट हवामानात खेळण्यासाठी भारतीय संघाने विशेष तयारी केली आहे. बेंगळूरुमध्ये आम्ही सराव शिबिरे आयोजित केली होती. या स्पर्धेत चांगली सुरुवात करून आम्ही भुवनेश्वर येथे होणाऱ्या एफआयएच सीरिज फायनल्स स्पर्धेची तयारी करणार आहोत. शिबिरात आम्ही कसून मेहनत घेतली आहे.’’

‘‘सलामीच्या लढतीतच आम्ही आशियाई स्पर्धेतील विजेत्या जपानशी दोन हात करावे लागणार आहेत. त्यांना पराभूत करण्यासाठी आम्हाला सर्वोत्तम खेळ करावा लागेल. भारतीय संघात युवा खेळाडूंचा भरणा असून सांघिक कामगिरीवर आमचा भर राहील,’’ असे मनप्रीतने सांगितले. भारतीय संघाचा दुसरा सामना २४ मार्च रोजी कोरियाशी तर आशियाई स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या मलेशियाशी २६ मार्च रोजी भारताला लढत द्यावी लागेल.

‘‘या स्पर्धेत एकापेक्षा सरस संघ सहभागी होणार असल्यामुळे आम्हाला कुणालाही कमी लेखण्याची चूक करून चालणार नाही. एका वेळी आम्हाला एका सामन्याचाच विचार करावा लागणार आहे. प्रत्येक सामना आमच्यासाठी महत्त्वाचा असून त्याद्वारेच आम्हाला अंतिम फेरीसाठी पात्र होता येणार आहे,’’ असेही मनप्रीतने नमूद केले.

विश्वचषकातील पराभवाबाबत मनप्रीत म्हणाला की, ‘‘उपांत्यपूर्व फेरीतच गाशा गुंडाळावा लागल्यानंतर संघातील बहुतेक खेळाडूंना त्यातून भरपूर काही शिकता आले. आता दडपणाच्या परिस्थितीत कामगिरी कशी उंचवायची, याची पुरेपूर जाण आम्हाला आहे. संघात कमालीची गुणवत्ता असली तरी आम्हाला उपांत्यपूर्व फेरीपलीकडे झेप घेता आलेली नाही. आता आम्ही आमच्या चुकांवर लक्ष केंद्रित केले आहे. नव्या जोडय़ा तयार केल्यामुळे आमचा खेळ विकसित होण्यास मदत होणार आहे.’’