भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने फिनलंडमधील कुओर्टेन गेम्समध्ये कांस्यपदक पटकावले आहे. त्याने ८६.७९ मीटर लांब फेकत ही कामगिरी केली. चोप्राने ८३.२१ मीटरसह सुरुवात केली. त्यानंतर दुसर्‍या प्रयत्नात त्याने ८६.७९ मीटर लांब भाला फेकला. बाकी चारही प्रयत्न त्याचे फाऊल ठरवण्यात आले.

विश्वविजेत्या आणि ऑलिम्पिकमधील सुवर्णपदकाचा दावेदार असलेल्या जर्मनीच्या जोहानेस वेटरने ९३.५९ मीटर अशी लांबी नोंदवत सुवर्ण जिंकले. लंडन ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण व रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणा़ऱ्या त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या केशोर्न वालकोटने ८९.१२ मीटर लांब भाला फेकत कांस्यपदक जिंकले.

 

एका वर्षानंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळणाऱ्या नीरज चोप्राने पोर्तुगालच्या लिस्बन येथे ८३.१८ मीटरच्या कामगिरीसह विजय मिळवला. पहिल्या प्रयत्नात त्याने ८०.१७ मीटर भाला फेकला. सहाव्या आणि अंतिम प्रयत्नात त्याने ८३.१८ मीटरपर्यंत मजल मारली.

हेही वाचा – टोकियो ऑलिम्पिक : सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूला तामिळनाडू सरकारकडून मिळणार ३ कोटी!

भारताचा २३ वर्षीय स्टार खेळाडू नीरजने गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळविली होती, पण त्यानंतर तो कोणत्याही स्पर्धेत भाग घेऊ शकला नाही. राष्ट्रकुल चॅम्पियन नीरजची सर्वोत्कृष्ट कामगिरी ८८.०७ मीटर अशी आहे.