भारतीय हौशी कबड्डी महासंघावर (एकेएफआय) वर्चस्व असलेली ‘गेहलोतशाही’ यापुढेही सुरू राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. केद्रीय खात्याच्या क्रीडा विधेयकाचा आदर राखून भारतीय हौशी कबड्डी महासंघाची निवडणूक प्रक्रिया चालू आहे. या निवडणूक कार्यक्रमानुसार १९ मे रोजी महासंघाची निवडणूक आणि वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. परंतु निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीतूनच आगामी चित्र स्पष्ट झाले असून, भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या कार्यकारिणी समितीवरील चौदाही जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. फक्त बदलाचा भाग म्हणजे या वेळी ‘एकेएफआय’चे मावळते अध्यक्ष जनार्दनसिंग गेहलोत यांच्याकडून हे सिंहासन त्यांची पत्नी डॉ. मृदुल भदौरिया यांच्याकडे गेले आहे. याव्यतिरिक्त महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे नवे अध्यक्ष किशोर पाटील यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे.
भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या २००९मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर ६ जून २०१३पर्यंत नवी कार्यकारिणी नेमण्यासाठी मुदत होती. परंतु ‘एकेएफआय’ नियोजित कायक्रमाप्रमाणे प्रक्रिया राबवली. त्यानुसार ‘एकेएफआय’शी संलग्न असलेल्या २८ राज्यांचे ५६ प्रतिनिधी देशाचे कबड्डी पदाधिकारी ठरविणार होते. केंद्र शासनाच्या क्रीडा विधेयकाचे आव्हान या वेळी ‘एकेएफआय’ला पेलायचे होते. राजस्थानच्या राजकारणातील मुरब्बी राजकारणी गेहलोत यांनी त्यावरही मात करीत महासंघावरील आपले वर्चस्व अबाधित राखले आहे.
गेहलोत यांनी सुमारे एक तप (१२ वष्रे म्हणजे तीन कार्यकाळ) अध्यक्षपदावर राज्य केले. याचप्रमाणे आंध्र प्रदेशच्या जगदीश्वर यादव यांनी आठ वष्रे (दोन कार्यकाळ) सरचिटणीस पदाची जबाबदारी सांभाळली. परंतु केंद्राच्या क्रीडाविषयक मार्गदर्शक तत्त्वानुसार गेहलोत आणि यादव या दोघांनाही या वेळी निवडणूक लढता येणार नव्हती. त्यामुळे गेहलोत यांनी चाणाक्षपणे आपली पत्नी मृदुल भदौरिया यांच्याकडे ही धुरा सोपवली आहे. केंद्राच्या क्रीडा मार्गदर्शक तत्त्वांमध्ये एक कार्यकाळाच्या अंतराने ही मंडळी पुन्हा कार्यकारिणीत येऊ शकतात, अशीसुद्धा तरतूद असल्याचे समजते. या पाश्र्वभूमीवर गेहलोत पुढील वर्षांनंतर पुन्हा व्यक्तिश: कार्यकारिणीवर अवतरू शकतात.
‘एकेएफआय’ने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीतून भदौरिया या गेहलोत यांच्या पत्नी असल्याचे जसे स्पष्ट होत नाही. तसेच त्यांच्या नावापुढे त्यांच्या प्रतिनिधित्व असलेल्या राज्याचाही उल्लेख नाही. या ठिकाणी ‘आवश्यकता नाही’ असे नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, अध्यक्षपदाच्या उमेदवाराला कोणत्याही प्रतिनिधित्वाची गरज नाही, असे नियमावलीत असल्याचे कबड्डीमधील जाणकारांकडून समजते.
रविवारी, १९ मे रोजी जयपूरमध्ये भारतीय हौशी कबड्डी महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार असून, न्यायमूर्ती के. एस. राठोर निवडणुकीचा निकाल जाहीर करतील.

भारतीय हौशी कबड्डी महासंघाची कार्यकारिणी अशी –
अध्यक्ष : डॉ. मृदुल भदौरिया
कार्याध्यक्ष : के. ई. प्रभाकर (आंध्र प्रदेश)
उपाध्यक्ष : १. भुबनेश्वर कलिता (आसाम), २. एम. हनुमंते गौडा (कर्नाटक), ३. जे. पी. अगरवाल (उत्तर प्रदेश), ४. विजय प्रकाश (हरयाणा), ५. किशोर पाटील (महाराष्ट्र)
सरचिटणीस : दिनेश पटेल (गुजरात)
कोषाध्यक्ष : गणेशश्वर मुदिराज कसानी (हैदराबाद)
संयुक्त सचिव : १. निरंजन सिंग (दिल्ली), २. कुलदीप गुप्ता (जम्मू आणि काश्मीर), ३. कुमार विजय (बिहार), ४. एस. एस. लक्कड (मध्य प्रदेश), ५. ए. सफीउल्ला (तामिळनाडू)