महाराष्ट्राच्या शैलजा जैन यांना भारतीय कबड्डी महासंघाकडून सापत्न वागणूक

काठमांडू (नेपाळ) येथे चालू असलेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी (सॅफ) भारतीय संघ निवड करताना महाराष्ट्राच्या पुरुष खेळाडूंना डावलणाऱ्या भारतीय हौशी कबड्डी महासंघाने प्रशिक्षक शैलजा जैन यांनाही अशीच सापत्न वागणूक दिली आहे. भारताच्या प्रशिक्षकपदावर नियुक्ती करण्यात आलेल्या जैन यांच्याकडे ‘सॅफ’ स्पर्धेसाठी मात्र व्यवस्थापक म्हणून जबाबदारी सोपवून बोळवण केली आहे.

गतवर्षी झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत इराणच्या महिला संघाला सुवर्णपदक जिंकून देण्याची किमया जैन यांनी साधली होती. त्या वेळी अंतिम सामन्यात इराणकडून पराभूत झालेल्या भारतीय संघाचे प्रशिक्षकपद बनानी साहा सांभाळत होत्या. जैन यांच्या कामगिरीचा सन्मान करताना भारतीय कबड्डी महासंघाने गतवर्षी राष्ट्रीय निवड समितीवर त्यांना स्थान दिले होते. त्यामुळे रोहा येथे झालेल्या पुरुषांच्या आणि पाटणा येथे झालेल्या महिलांच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्या निवड समिती सदस्य म्हणून कार्यरत होत्या. त्यानंतर भारतीय संघटनेने प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले होते. यात नऊ अर्जामधून सुनील डबास, बनानी साहा आणि जैन या तिघींची महिला संघाच्या प्रशिक्षकपदावर निवड करण्यात आली.

नेपाळ येथील ‘सॅफ’ स्पर्धेसाठी मग याच तिघींवर भारताच्या महिला संघाच्या निवडीची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यामुळे रोहतक (हरयाणा) येथे ५ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या संभाव्य खेळाडूंच्या राष्ट्रीय सराव शिबिराला डबास आणि साहा यांच्यासह जैन यांचेसुद्धा मार्गदर्शन लाभले होते. पण ‘सॅफ’ स्पर्धेसाठी संघ पाठवताना मात्र डबास आणि साहा यांना प्रशिक्षक म्हणून पाठवण्यात आले आहे, तर जैन यांना व्यवस्थापक म्हणून पाठवण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणाऱ्या पुरुष खेळाडूंकडे दुर्लक्ष करणाऱ्या आणि साखळीतच गारद होणाऱ्या महाराष्ट्राच्या अपयशाला जबाबदार ठरणाऱ्या महिला खेळाडूंची भारताच्या संघात निवड करणाऱ्या भारतीय हौशी कबड्डी महासंघाचा आणखी एक प्रताप समोर आला आहे.