आशियाई सांघिक बॅडमिंटन स्पर्धा

जागतिक क्रमवारीत २४व्या स्थानी असलेल्या एच. एस. प्रणॉयकडे भारताच्या युवा संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू आणि किदम्बी श्रीकांत या अव्वल खेळाडूंच्या अनुपस्थितीत १९ ते २४ मार्चदरम्यान हाँगकाँग येथे रंगणाया आशियाई मिश्र सांघिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या युवा संघाची मदार प्रणॉयवर असेल.

आगामी इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेसाठी सायना, सिंधू आणि श्रीकांत यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय बॅडमिंटन महासंघाने (बाइ) या संघात सात युवा महिला बॅडमिंटनपटूंना संधी दिली आहे. आसामची अश्मिता चालिहा ही महिला संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे. १९ वर्षीय अश्मिताने अनेक बीडब्ल्यूएफ जेतेपदे आपल्या नावावर केली असून या वर्षीच्या राष्ट्रीय स्पर्धेत तिने अंतिम फेरीत धडक मारली होती.

नागपूरची वैष्णवी भाले ही युवा खेळाडूही भारतीय संघात असून तिने या वर्षीच्या राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली होती. त्याचबरोबर शिखा गौतम आणि अश्विनी भट या राष्ट्रीय स्पर्धेत चमकलेल्या युवा खेळाडूही भारतीय संघात असतील. रुतापर्णा पांडा, अराठी सारा सुनील, यूके मिथूला यांचाही महिला संघात समावेश करण्यात आला आहे.

प्रणॉयच्या नेतृत्वाखालील पुरुष संघात तीन वेळा राष्ट्रीय विजेता सौरभ वर्माचा समावेश आहे. त्याचबरोबर एमआर अर्जुन आणि श्लोक रामचंद्रन ही राष्ट्रीय स्पर्धेतील रौप्यपदक विजेती जोडी पुरुष दुहेरीत उतरणार आहे. त्याचबरोबर अरुण जॉर्ज आणि संयम शुक्ला हेसुद्धा त्यांच्या दिमतीला असतील.

सहा दिवस रंगणाऱ्या या स्पर्धेत ११ संघांची चार गटात विभागणी करण्यात आली असून ब गटात भारतासह चायनीज तैपेई आणि सिंगापूर हे संघ असतील. प्रत्येक गटातून दोन  संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील.

भारतीय संघ :

पुरुष – एच. एस. प्रणॉय, सौरभ वर्मा, एमआर. अर्जुन, श्लोक रामचंद्रन, अरुण जॉर्ज, संयम शुक्ला. महिला – अश्मिता चालिहा, वैष्णवी भाले, शिखा गौतम, अश्विनी भट, रुतापर्णा पांडा, अराठी सारा सुनील, यूके. मिथुला.