कोरियात झालेल्या चौथ्या आशियाई इन्डोअर आणि मार्शल आर्ट्स क्रीडा स्पध्रेमधील कबड्डी या क्रीडाप्रकारात ऑलिम्पिक ध्वजाखाली सहभागी झालेल्या भारतीय चमूने दोन्ही गटांमध्ये इराणचा पाडाव करून सुवर्णपदकाचा मान प्राप्त केला. महिला विभागामध्ये भारताने इराणचा ५४-३१ अशा फरकाने पराभव केला. मध्यंतराला भारताकडे २८-१४ अशी आघाडी होती. पुरुष विभागात भारताला इराणने तोलामोलाची टक्कर दिली. पहिल्या सत्राअखेर भारताकडे १९-१६ अशी नाममात्र आघाडी होती. परंतु कबड्डी या खेळातील आपला अनुभव आणि कौशल्य पणाला लावून भारताने इराणचा ४२-३२ असा पराभव केला. आशियाई इन्डोअर आणि मार्शल आर्ट्स क्रीडा स्पध्रेत मकाऊ आणि व्हिएटनामपाठोपाठ सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदक मिळविण्याची किमया साधली. तथापि, महिला कबड्डीचा या वर्षी प्रथमच समावेश करण्यात आला होता.
भारतावर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने बंदी घातली आहे. त्यामुळे भारतीय संघाने सुवर्णपदक जिंकल्यावरही देशाचा राष्ट्रध्वज फडकावण्यात आला नाही आणि राष्ट्रगीतही सुनावण्यात आले नाही. भारतीय महिला संघाला कोरियन कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष चो जाइकी यांच्याकडून तर पुरुष संघाला गेहलोत यांच्याकडून सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.
कबड्डीच्या अंतिम सामन्यांना सुरूवात होण्यापूर्वी इराणच्या क्रीडामंत्र्यांनी आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाचे अध्यक्ष जनार्दनसिंग गेहलोत यांच्याशी भेट घेतली. या भेटीमध्ये जागतिक स्तरावर कबड्डीचा प्रचार करण्यात भारताला आणि इराणला कशा प्रकारे पुढाकार घेता येईल, याबाबत चर्चा झाली. ऑलिम्पिकचे महत्त्वाकांक्षी स्वप्न साकारण्यासाठी भारताला या खेळाकरिता ५० देशांचे प्रतिनिधित्व आवश्यक आहे.
या विजयाबद्दल महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे कोषाध्यक्ष आणि अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू शांताराम जाधव यांनी सांगितले की, ‘‘भारताच्या दोन्ही संघांचे मन:पूर्वक अभिनंदन. पुरुषांच्या अंतिम सामन्यांतील गुणांचा फरक हा विचार करायला लावणारा आहे. भविष्यात कबड्डीची स्थिती हॉकीसारखी तर होणार नाही ना? भारताच्या पुरुष संघात एखादा तरी महाराष्ट्राचा खेळाडू असता तर हा आनंद द्विगुणीत झाला असता.’’
महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह रमेश देवाडिकर यांनी सांगितले की, ‘‘भारताच्या दोन्ही संघांमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंना स्थान मिळावे, याकरिता कुमार गटाच्या खेळाडूंना प्रशिक्षण देण्याची एक विशेष योजना आम्ही तयार केली आहे. महाराष्ट्रातून दर्जेदार खेळाडू निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.’’