भारताने ओमानवर ३-० अशी मात करीत आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेत आव्हान राखले. ही स्पर्धा जपानमध्ये आयोजित करण्यात आली आहे.
बहुतांश युवा खेळाडूंचा समावेश असलेल्या भारताने या सामन्यात वर्चस्व गाजविले. मात्र पहिला गोल करण्यासाठी त्यांना १९ मिनिटे वाट पहावी लागली. आकाशदीपसिंग याने ओमान संघाच्या बचावरक्षकांना चकवित भारताचे खाते उघडले. ३० व्या मिनिटाला भारतास गोल करण्याची आणखी एक संधी मिळाली. प्रभदीपसिंग याने जोरदार चाल करीत तलविंदरसिंग याच्याकडे पास दिला. तलविंदर याने चपळाईने चेंडू गोलात मारला आणि भारतास २-० अशी आघाडी मिळवून दिली. पूर्वार्धात भारताने २-० अशी आघाडी मिळविली होती.
उत्तरार्धात ओमानच्या खेळाडूंनी भारताच्या अनेक चाली परतविण्यात यश मिळविले. मात्र ६२ व्या मिनिटाला अमित रोहिदास याने भारतास मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचा लाभ घेत संघाचा तिसरा गोल केला. त्यानंतर मात्र गोल करण्यात भारताला यश मिळाले नाही.
भारताची आता पाकिस्तानशी गाठ पडणार आहे. हा सामना गुरुवारी होणार आहे. पहिल्या सामन्यात भारतास चीनने २-० असे हरविले होते, तर दुसऱ्या सामन्यात जपानने भारतावर २-१ अशी मात केली होती.