भारताच्या कुस्तीपटूंनी बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत पुरुष फ्रीस्टाईल प्रकारात चमकदार कामगिरी करून सहावे स्थान पटकावल्यामुळे भारताचा पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक कुस्ती स्पर्धेसाठी पहिल्यांदाच प्रवेश निश्चित झाला आहे.
भारताने पुरुषांच्या फ्रीस्टाईल प्रकारात २३ गुणांसह सहावे स्थान पटकावले. इराण, रशिया, जॉर्जिया, युक्रेन आणि अमेरिकेने अनुक्रमे पहिले ते पाचवे स्थान प्राप्त केले. जागतिक कुस्ती महासंघाच्या नियमांनुसार, जागतिक कुस्ती स्पर्धेतील आठ संघ विश्वचषकासाठी पात्र ठरतात. अमित कुमारचे रौप्यपदक आणि बजरंगचे कांस्यपदक यामुळे भारताच्या समावेशाला बळकटी मिळाली. ‘‘ऑलिम्पिकमध्ये कुस्तीचा पुन्हा समावेश झाल्यानंतर भारतीय कुस्तीसाठी ही बातमी म्हणजे दुग्धशर्करा योग ठरला. भारतीय कुस्तीपटूंनी जागतिक कुस्ती स्पर्धेत चांगली कामगिरी केली. त्यांच्या कामगिरीचे फळ भारताला मिळाले,’’ असे राष्ट्रीय प्रशिक्षक विनोद कुमार यांनी सांगितले.
जागतिक कुस्ती स्पर्धा
भारतीय महिलांची
निराशाजनक कामगिरी
बुडापेस्ट : भारताच्या महिला कुस्तीगिरांनी जागतिक कुस्ती स्पर्धेत निराशा केली. नवज्योत कौर व ज्योतीकुमारी यांचे या स्पर्धेतील आव्हान शुक्रवारी संपुष्टात आले. नवज्योतने ६७ किलो गटातील पहिल्या फेरीत ब्राझीलच्या गिल्डा डी ऑलिव्हिरा हिला ११-४ असे सहज हरविले. मात्र दुसऱ्या फेरीत तिला कोलंबियाच्या लिडी मेंडेझ हिने ९-० असे पराभूत केले. ७२ किलो गटात ज्योतीने पहिल्या फेरीत तुर्कस्तानच्या येमिन अडार हिला चांगली लढत दिली. नंतरच्या तीन मिनिटांमध्ये अडारने तिला अस्मान दाखवित निर्णायक विजय मिळविला. पुरुष गटात भारताच्या गौरव शर्माला उपउपांत्यपूर्व फेरीत अझरबैजानच्या ओर्खान अहमदोव्ह याच्याविरुद्ध हार पत्करावी लागली. त्याने ग्रीसच्या लाझारोस करथानासिस याचा ८-० असा धुव्वा उडविला होता. तथापि ओर्खानविरुद्ध त्याचा निभाव लागला नाही.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 22, 2013 4:45 am