नवी दिल्ली : ‘आयटीटीएफ’ आशियाई टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेतील पाचव्या ते आठव्या क्रमांकासाठीच्या लढतीत बुधवारी भारतीय पुरुष संघाने पाचवे स्थान मिळवले. भारताने हाँगकाँगचा ३-१ असा पराभव केला, तर इराणचा ३-० असा धुव्वा उडवून भारताने विजेत्यांच्या विभागात सुवर्णपदक पटकावले. हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात भारतासाठी शरथ कमाल, अ‍ॅन्थनी अमलराज आणि जी. साथियन यांनी विजय मिळवले. विभागीय अंतिम लढतीत शरथने विजयी सलामी दिली, तर साथियन आणि अमलराज यांनीसुद्धा आणखी एका विजयाची नोंद करून भारताला विजेतेपद मिळवून दिले. स्पर्धेतील एकेरी गटाच्या सामन्यांना गुरुवारपासून सुरुवात होणार आहे.