भारतीय पुरुष संघाने ४१व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये शानदार कामगिरीचे प्रदर्शन करत अर्जेटिनाला बरोबरीत रोखले. मात्र भारतीय महिला संघाला युक्रेनकडून पराभवाचा सामना करावा लागला.
फॉर्मात असलेल्या एस. पी. सेतुरामनने सँड्रो मरेकोविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात जिंकण्याची संधी असतानाही बरोबरी पत्करली; अन्यथा भारताच्या पुरुष संघाने विजयाची नोंद केली असती. पहिल्या पटावर ग्रँडमास्टर परिमार्जन नेगीने फर्नाडो पेराल्टा याला बरोबरीत रोखले. तिसऱ्या सामन्यात चांगल्या स्थितीत असतानाही कृष्णन शशिकिरणने रुबेन फेल्गेअरविरुद्ध बरोबरी पत्करली. बी. अधिबान आणि दिएगो फ्लोरेस यांच्यातील लढतही बरोबरीत सुटली. त्यामुळे भारत आणि अर्जेटिना यांच्यातील सामना २-२ असा बरोबरीत राहिला. भारताचे नवव्या फेरीअखेर १३ गुण झाले असून ते १५ गुणांसह अव्वल स्थानावर असलेल्या चीन आणि फ्रान्सपेक्षा फक्त दोन गुणांनी मागे आहेत. युक्रेन, बल्गेरिया, हंगेरी, अझरबैजान आणि रोमानिया यांनी १४ गुणांसह संयुक्तपणे तिसरे स्थान पटकावले आहे. भारतीय संघ रशिया आणि अर्मेनियासह संयुक्तपणे आठव्या स्थानी आहे.
महिलांमध्ये भारताला युक्रेनकडून १.५-२.५ असा पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्यामुळे जेतेपदाच्या शर्यतीतून भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. द्रोणावल्ली हरिका, मेरी अ‍ॅन गोम्स आणि पद्मिनी राऊत यांनी अनुक्रमे अ‍ॅना मुझीचक, अ‍ॅना उशेनिना आणि नतालिया झुकोव्हाविरुद्ध बरोबरी पत्करली. पण तानिया सचदेव हिला मारिया मुझीचक हिच्याकडून दुसऱ्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवामुळे भारतीय संघ १५व्या स्थानी फेकला गेला असून पुढील दोन्ही फेऱ्या जिंकल्या तरच भारतीय संघ अव्वल १० जणांमध्ये मजल मारू शकेल.