एफआयएच वर्ल्ड हॉकी लीग उपांत्य फेरी स्पध्रेत सकारात्मक निकाल हवा असल्यास प्रतिस्पर्धी संघावर सुरुवातीपासून दबाव निर्माण करा, असा गुरुमंत्र प्रशिक्षक पॉल व्हॅन अ‍ॅस यांनी सरदार सिंगच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाला दिला आहे. २० जून ते ५ जुलै या कालावधीत बेल्जियम येथे वर्ल्ड हॉकी लीग होणार आहे. या स्पध्रेसाठी भारतीय संघ येथे दाखल झाला आहे.
‘‘सराव सामन्यात भारतीय संघाला बरेच काही शिकायला मिळाले. फ्रान्सविरुद्ध आम्ही विजय साजरा केला, तर बेल्जियमविरुद्ध आम्हाला निसटता पराभव पत्करावा लागला. मात्र, या निकालातून मला गोष्ट समजली आणि ती म्हणजे प्रतिस्पर्धीवर सुरुवातीपासून दबाव निर्माण करण्याची आम्हाला गरज आहे,’’ असे मत  अ‍ॅस यांनी व्यक्त केले.
प्रतिस्पर्धी संघाच्या वर्तुळात जाऊन गोल करण्याची संधी शोधण्यापेक्षा पेनल्टी कॉर्नरवर भर देण्याची गरज असल्याचे मतही या वेळी व्हॅन अ‍ॅस यांनी मांडले. मात्र, त्यांनी खेळाडूंच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘सराव सामन्यात प्रतिस्पर्धी संघाची बचावफळी भेदण्यात खेळाडूंना यश मिळाले, परंतु त्यांनी निकाल आपल्या बाजूने लागेल यासाठी प्रयत्नशील असायला हवे.  सुरुवातीचा गोल नावावर करून प्रतिस्पर्धीवर दबाव निर्माण करणे सोपे जाईल.’’