News Flash

ऑलिम्पिक पूर्वतयारी हॉकी स्पर्धा : भारतीय पुरुषांची लढत मलेशियाशी

मनप्रीतच्या अनुपस्थितीत ड्रॅगफ्लिकर हरमनप्रीत पुरुष संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे.

| August 17, 2019 03:26 am

महिला हॉकी संघाचा सामना यजमान जपानशी

टोक्यो : जपानमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तेथील कोर्टचा सराव व्हावा, या उद्देशाने ऑलिम्पिक पूर्वतयारी हॉकी स्पर्धा शनिवारपासून आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी भारताचे दोन्ही संघ सज्ज झाले असून पुरुषांचा सलामीचा सामना मलेशियाशी, तर महिला संघाला यजमान जपानशी दोन हात करावे लागतील.

भारताच्या दोन्ही संघांना टोक्यो ऑलिम्पिकसाठी आपले स्थान निश्चित करता आले नसले तरी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ‘एफआयएच’ ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेमध्ये दोन्ही संघांनी मजल मारली आहे. भारताने कर्णधार मनप्रीत सिंग, गोलरक्षक पी. आर. श्रीजेश या अनुभवी खेळाडूंना विश्रांती दिली असून युवा खेळाडूंना अधिकाधिक संधी देण्याचे ठरवले आहे. मनप्रीतच्या अनुपस्थितीत ड्रॅगफ्लिकर हरमनप्रीत पुरुष संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे.

भारत आणि मलेशिया यांच्यात झालेल्या गेल्या १० लढतींमध्ये भारताने सहा वेळा, तर मलेशियाने तीन वेळा विजय मिळवला आहे. त्यानंतर जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असलेल्या भारताला रविवारी न्यूझीलंडशी आणि त्यानंतर जपानशी खेळावे लागणार आहे.

भारतीय महिला संघासमोर पहिल्या सामन्यात दुबळ्या जपानचे आव्हान असले तरी त्यानंतर त्यांना ऑस्ट्रेलिया आणि चीन या बलाढय़ संघांशी लढत द्यावी लागेल. या वर्षी झालेल्या एफआयएच सीरिज फायनल्स स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जपानने भारताला ३-१ असे हरवले होते.

नव्याकोऱ्या स्टेडियमवर गेल्या काही दिवसांपासून आम्ही खडतर सराव करत आहोत. मलेशियाविरुद्धच्या आमच्या लढती चुरशीच्या झाल्या असून शनिवारच्या सामन्यातही त्याचीच पुनरावृत्ती पाहायला मिळेल, अशी आशा आहे.

-ग्रॅहम रीड, पुरुष संघाचे प्रशिक्षक

या स्पर्धेत आम्ही चांगली सुरुवात करू, अशी आशा आहे. बलाढय़ संघांविरुद्ध आमचे कर्तृत्व सिद्ध करण्याची नामी संधी  मिळाली आहे. त्यामुळे आम्हाला ऑलिम्पिक पात्रता फेरीची तयारी करता येईल.

-शोर्ड मरिन, महिला संघाचे प्रशिक्षक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2019 3:26 am

Web Title: indian men hockey teams match against malaysia for olympics preparations zws 70
Next Stories
1 किर्गिऑसवर बंदीची टांगती तलवार
2 कर्जाच्या बोजामुळे चंद्रशेखर यांची आत्महत्या
3 भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्रींची फेरनिवड
Just Now!
X