बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये आव्हान राखण्यासाठी सहाव्या फेरीत भारतीय पुरुष संघ मोल्दोवा संघावर मात करण्यासाठी उत्सुक आहे. भारताने आतापर्यंत या स्पर्धेत एक सामना गमावला आहे. एक सामना बरोबरीत सोडविला असून तीन सामन्यांमध्ये विजय मिळविला आहे.
शुक्रवारच्या विश्रांतीचा फायदा घेत भारतीय संघ चांगल्या कामगिरीसाठी उत्सुक आहे. अव्वल दर्जाचा खेळाडू परिमार्जन नेगी याच्यावर भारताची भिस्त आहे. त्याला मोल्दोवाचा सर्वोत्तम खेळाडू व्हिक्टर बोलोगन याच्याशी खेळावे लागणार आहे. दुसऱ्या लढतीत कृष्णन शशिकिरण याला दिमित्री स्वेतुश्किन याच्याविरुद्ध विजयाची आशा आहे. एम.आर.ललित बाबू याला लिव्हियु सेर्बुलेन्को याच्याशी खेळावे लागणार आहे तर बी.अधिबन याच्यापुढे व्लादिमीर हॅमिटेव्हिक याचे आव्हान असणार आहे. भारताचे सात गुण झाले आहेत. अझरबैजान, जॉर्जिया, सर्बिया, बल्गेरिया, क्यूबा, कझाकिस्तान व उजबेकिस्तान यांनी संयुक्त आघाडी घेतली आहे.
महिलांमध्ये भारताची स्पेनशी गाठ पडणार आहे. चीन, हंगेरी व रशिया यांनी प्रत्येकी दहा गुणांसह संयुक्त आघाडी घेतली आहे.