इंडोनेशियन ओपनमध्ये भारताच्या पुरुष खेळाडूंनी आपलं आव्हान कायम ठेवलं आहे. पुरुषांच्या एकेरी लढतीत भारताच्या श्रीकांत किदम्बीने चायनीज तैपेईच्या झू वाई वँगवर सरळ दोन सेट्समध्ये विजय मिळवला. २१-१५, २१-१४ अशा फरकाने विजय मिळवत श्रीकांत इंडोनेशियन ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. तर दुसऱ्या सामन्यात एच.एस.प्रणॉयने चीनच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या चेन लाँगला २१-१८, १६-२१, २१-१९ अशा सेट्समध्ये हरवलं.

श्रीकांत विरुद्ध झू वँग यांच्यात आधी झालेल्या सामन्याचा इतिहास पाहता या सामन्यात श्रीकांत बाजी मारेल अशी आशा वर्तवण्यात येत होती. प्रत्यक्ष सामन्यातही तसचं झालं, श्रीकांतने केलेल्या आक्रमक खेळामुळे सुरुवातीच्या सेट्समध्ये त्याच्याकडे ७-० अशी मोठी आघाडी तयार झाली. झू वँगने या सामन्यात श्रीकांतवर अनेकदा चढाई करण्याचा प्रयत्न केला. मात्र श्रीकांतने आपली ४-५ गुणांची आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली आणि पहिला सेट आपल्या खिशात घातला.

दुसऱ्या सेटमध्ये मात्र झू वँगने आपल्या खेळात अमुलाग्र बदल केला. दुसऱ्या सेटमध्ये वँगने श्रीकांतविरुद्ध ४-१ अशी आघाडी घेतली. मात्र किदम्बी श्रीकांतने पुन्हा झुंजार खेळ करत ही आघाडी आपल्याकडे खेचून घेतली. या सेटमध्येही वँगने श्रीकांतला लढत देण्याचा प्रयत्न केला खरा मात्र श्रीकांतने वँगला सामन्यात डोकं वर काढायची संधीच दिली नाही. अखेर श्रीकांतने दुसरा सेटही आपल्या नावे करत सामना जिंकला.

दुसरीकडे प्रणॉयसमोर चीनच्या खेळाडूचं तगडं आव्हान असल्यामुळे हा सामना प्रणॉयला कठीण जाईल असं दिसतं होतं. चीनच्या खेळाडूने आपल्या खेळाची सुरुवातही तितक्याच आक्रमकतेने केली. चेन लाँगच्या आक्रमक खेळापुढे प्रणॉय काही काळ चाचपडताना दिसत होता. मात्र यातून सावरुन प्रणॉयने सामन्यात बरोबरी साधली. पहिल्या सेटमध्ये प्रणॉयने आपल्या प्रतिस्पर्ध्यावर दबाव टाकत पॉईंट मिळवायला सुरुवात केली. चेन लाँगने अनेक स्मॅशचे फटके वाया गेले. प्रणॉयने दिलेल्या कडव्या लढतीमुळे चेन लाँग पहिल्या सेटमध्ये चांगलाच अडचणीत आलेला पहायला मिळाला. तरीही काही वेळातचं लाँगने प्रणॉयची आघाडी काही गुणांनी कमी केली. मात्र सेटवर पकड बसवलेल्या प्रणॉयने सेट आपल्या हातून निसटून दिला नाही.

दुसऱ्या सेटच्या सुरुवातीला सामन्याचं पारड हे तराजूच्या काट्यांप्रमाणे सारख दोलायमान पहायला मिळालं. दोन्ही खेळाडूंमध्ये गुणांचा फरक सतत कमी जास्त होताना पहायला मिळत होता. मात्र यावेळी चेन लाँगने आपला अनूभव पणाला लावत दुसरा सेट आपल्या खिशात घातला. तिसऱ्या सेटमध्येही प्रणॉय आणि चेन लाँग यांच्यात चांगलीच झुंज पहायला मिळाली. सुरुवातीला आघाडी घेतलेल्या चेन लाँगला प्रणॉयने टक्कर देत कडवं आव्हान दिलं. अखेरच्या क्षणांमध्ये १७-१७ अशी बरोबरी झालेली असताना प्रणॉयने आपले ठेवणीतले फटके वापरत आपल्या चीनी प्रतिस्पर्ध्याला पराभवाचा धक्का दिला.

किदम्बी श्रीकांत आणि प्रणॉय यांच्या खेळामुळे इंडोनेशियन ओपनमध्ये भारताच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे उपांत्य फेरीत दोन्ही खेळाडूंकडून अशीच कामगिरी व्हावी अशी आशा सर्व भारतीय व्यक्त करतायत.