भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर १५ ऑगस्टच्या दिवशीच महेंद्र सिंग धोनी याने निवृत्ती जाहीर केली आहे. आत्तापर्यंतच्या टीम इंडियाच्या यशस्वी कप्तानांपैकी एक म्हणून धोनीचा लौकिक आहे. धोनीनं आपले आवडते गायक मुकेश यांचं ‘मैं पल दो पल का शायर हूं…’ हे गाणं शेअर आपली निवृत्ती जाहीर केली.

भारतीय संघाच्या यशस्वी कर्णधारांपैकी धोनी एक आहे. तो जगातील एकमेव असा कर्णधार आहे ज्यानं आपल्या संघाला आयसीसीच्या तीन ट्रॉफी मिळवून दिल्या. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं २००७ मध्ये टी-२० विश्वचषक, २०११ मध्ये विश्वचषक आणि २०१३ मध्ये चॅम्पियन्स टॉफी जिंकली आहे. धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असली तरी तो आयपीएल खेळत राहणार आहे.

 

View this post on Instagram

 

Thanks a lot for ur love and support throughout.from 1929 hrs consider me as Retired

A post shared by M S Dhoni (@mahi7781) on

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्यानं निवृत्ती घेतली असली तरी तो आयपीएल सामन्यांमध्ये मात्र दिसणार आहे. ३९ वर्षीय धोनीनं यापूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. महेंद्रसिंह धोनीनं आपल्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे आपल्या निवृत्तीची घोषणा केली. “सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद. आज संध्याकाळी ७.२९ पासून मला निवृत्त समजलं जावं,” असं त्यानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

२०१९ विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यानंतर तत्कालीन निवड समितीने धोनीला नंतर स्थान दिलं नाही. संपूर्ण स्पर्धेत धोनीची संथ खेळी ही चर्चेत राहिली होती. २०१९ विश्वचषकानंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करणार होता. परंतु विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्याच्याशी बोलून निवृत्तीचा निर्णय पुढे ढकलायला लावलं. मध्यंतरीच्या काळात संघात ऋषभ पंतची खराब कामगिरी लक्षात घेता धोनीला पुन्हा संघात स्थान द्यावी अशी मागणी होत होती. परंतु धोनीला पुन्हा संघात स्थान मिळालं नाही.