१० हजारांहून अधिक स्पर्धकांचा समावेश

वेस्टर्न नेव्हल कमांडच्या (डब्लूएनसी) भारतीय नौदल अर्धमॅरेथॉनच्या दुसऱ्या हंगामाला मुंबईकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. नौदल आणि सामान्य नागरिक यांच्यातील संवाद वाढावा, या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या भारतीय नौदल अर्धमॅरेथॉन शर्यतीमध्ये रविवारी दहा हजारांहून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला. यामध्ये ८५ टक्क्यांहून अधिक स्पर्धक हे सर्वसामान्य नागरिक असल्याचे डब्लूएनसीचे प्रमुख व्हाइस अ‍ॅडमिरल गिरीश लुथ्रा यांनी सांगितले. त्यांनी मुंबईकरांच्या प्रतिसादाचे कौतुक केले.

वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए आर-२ मैदानावरून या स्पध्रेला प्रारंभ झाला. फ्रीगेट रन ५ किलोमीटर, डिस्ट्रॉयर रन १० किलोमीटर आणि एअरक्राफ्ट कॅरियर रन २१ किलोमीटर अशा तीन गटांत पुरुष व महिलांसाठी शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई उपनगर जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन यांच्या सहकार्याने या स्पध्रेचे आयोजन करण्यात आले होते. पुढील वर्षी १८ नोव्हेंबरला ही स्पर्धा आयोजित करण्यात येईल, अशी घोषणा यावेळी लुथ्रा यांनी केली.

२१ किलो मीटर खुल्या गटात ज्ञानेश्वर मोरघा आणि लिलम्मा अल्फोन्सो यांनी अनुक्रमे पुरुष व महिला विभागात जेतेपद पटकावले.

पुरुष गटात मनोहर तांबे आणि विद्यानंद यादव यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे, तर महिला गटात क्रांती साळवी व पायल खन्ना यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान पटकावले. स्पर्धकांना उत्साह कायम राखण्यासाठी नौदलाच्या विशेष बँडचे आयोजन करण्यात आले होते.

इतर निकाल

२१ किमी 

  • वयस्कर पुरुष : पांडुरंग पाटील, सम्राट गुप्ता, पीयूष कुमार दास; महिला : प्रीती लाला, बेनर्ली मॅथ्यूज, मोनिका पटेल
  • वरिष्ठ वयस्कर पुरुष : पांडुरंग चौगुले, प्रवीण गायकवाड, जॉन कॅटिना; महिला : लता अलीमचंदानी, सँड्रा जेकीट, वीणा ठक्कर

१० किमी

  • वरिष्ठ पुरुष (६५ वर्षांवरील) : अशोक सोमेश्वर, अजित कुमार कंबोज, ए. व्ही. बॅरेक्टो; महिला : टेरेसा डीसुजा, नलिनी कायल, लिपिका सावळकर
  • वेटरन पुरुष : रवी कलसी, सुधाकर सालवणकर, सुनील हांडा; महिला : ऑलिव्हर रॉबर्ट्स, शालिनी अरोरा, गितांजली लिंका
  • पुरुष : दिनेश मोर्या, देविंदर सिंग, करणदीप सिंग; महिला : कविता भोईर, श्वेता गावडे, राशी कदम
  • मुले : शुभम अहिरे; मुली : मधुरा गिजारे.
  • ५ किमी मुले : गणेश पारेख, मुली : स्वाती पांडे