भारत आणि इंग्लंड दरम्यान नुकत्याच झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या रविचंद्रन अश्विनला आयसीसी कसोटीच्या अष्टपैलू क्रमवारीत पाचव्या स्थानावर बढती मिळाली आहे तर फलंदाजांच्या क्रमवारीत कर्णधार विराट कोहली पाचव्या स्थानी कायम राहिला.

गोलंदाजांच्या क्रमवारीत अश्विन ८०४ गुण मिळवून सातव्या स्थानी कायम आहे तर चेन्नई क्रिकेट कसोटीत विश्रांती घेतलेल्या जसप्रीत बुमराहने ७६१ गुणांसह आपले आठवे स्थान कायम राखले. ९०८ गुण मिळवून पॅट कमिन्सने अव्वल स्थान पटकावले आहे.

आयसीसी कसोटीच्या अष्टपैलू क्रमवारीत वेस्ट इंडीजच्या जेसन हॉल्डरने प्रथम स्थान मिळविले आहे. भारताच्या रविंद्र जडेजाने दुसरे (४०३ गुण), इंग्लंडच्या बेन स्टोक्सने तिसरे (३९७ गुण), बांगलादेशच्या शाकिब अल हसनने चौथे स्थान(३५२ गुण) तर अश्विनला ३३७ गुण मिळाले आहेत.

चेन्नईत इंग्लंड विरूध्द झालेल्या दुसऱ्या कसोटीत अश्विनने भारताच्या दुसर्‍या डावात शानदार १०६ धावा फटकावल्या आणि आपल्या ऑफस्पिन शैलीने आठ गडी बाद केले, ज्यात भारताने ३१७ धावांनी विजय मिळविला होता.