भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून बदनामी टाळण्यासाठीचा उपाय

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या वेळी भारतीय खेळाडूंकडे इंजेक्शन्स सापडल्यामुळे झालेली बदनामी टाळण्यासाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) खेळाडूंनी शक्यतो इंजेक्शन्स नेऊ नये, असे सर्व राष्ट्रीय क्रीडा संघटनांना कळवले आहे.

खेळाडूंना जी काही औषधे न्यायची आहेत किंवा इंजेक्शन्स न्यायची असल्यास संबंधित खेळांच्या राष्ट्रीय संघटनेकडून पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच जर काही औषधे उत्तेजके असल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित खेळाडूबरोबरच राष्ट्रीय संघटनेवरही कारवाई केली जाईल, असे ‘आयओए’ने स्पष्ट केले आहे.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या वेळी चालण्याच्या शर्यतीमधील खेळाडू के.टी.इरफान व तिहेरी उडीतील स्पर्धक राकेश बाबू यांच्याकडे प्रमाणित नसलेली इंजेक्शन्स आढळल्यामुळे त्यांना स्पर्धेतून डच्चू देण्यात आला होता.

याबाबत ‘आयओए’चे सरचिटणीस राजीव मेहता म्हणाले, ‘‘कोणतीही औषधे किंवा इंजेक्शन्स सीलबंद व पारदर्शक पिशवीत नेण्याचा सल्ला आम्ही आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना दिला आहे. तसेच त्याबाबत वैद्यकीय तज्ज्ञांचे प्रमाणपत्र नेणे बंधनकारक करण्यात आले आहे.जर एखाद्याला इंजेक्शन्सची आवश्यकता भासल्यास त्याला आशियाई क्रीडानगरीतील अधिकृत वैद्यकीय तज्ज्ञांकडून घेण्याबाबतही कळवण्यात आले आहे. त्यामुळे भारतीय ऑलिम्पिक संघटना आणि पर्यायाने देशाची बदनामी टळेल.’’