30 September 2020

News Flash

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनची निवडणूक वादग्रस्त ठरण्याची शक्यता

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनची (आयओए) निवडणूक रविवारी नवी दिल्लीमध्ये होत असून, ती वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.

| February 8, 2014 01:47 am

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनची (आयओए) निवडणूक रविवारी नवी दिल्लीमध्ये होत असून, ती वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. या निवडणुकीला न्यायालयात आव्हान दिले जाणार आहे, असे क्लीन स्पोर्ट्स इन्स्टिटय़ूटने (सीएसआय) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला (आयओसी) पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
आयओएच्या निवडणूक अधिकाऱ्याने काही उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींकडून थेट अर्ज न स्वीकारता असोसिएशनच्या दबाब गटातील व्यक्तींकडून हे अर्ज स्वीकारले असल्याचा दावा सीएसआयने केला असून आयओसीचे संचालक पीअर मिरो यांना याबाबत सविस्तर पत्र लिहिले आहे. ही निवडणूक पद्धत पारदर्शी नाही. ज्यांना मतदानाचा अधिकार आहे, त्या प्रत्येकाला निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. मात्र काही प्रभावी संघटकांनी काही उमेदवारांवर माघार घेण्यासाठी दडपण आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
काही इच्छुकांनी उमदेवारीचे अर्ज निवडणूक अधिकाऱ्याकडे पाठविले होते, मात्र हे अर्ज संबंधित अधिकाऱ्यापर्यंत पोहोचलेले नाहीत. आयओसीने निवडणूक अधिकाऱ्याकडे याबाबत सविस्तर माहिती घ्यावी व वस्तुस्थिती जाणून घ्यावी, अशीही विनंती सीएसआयने केली आहे.
अभयसिंग चौताला व ललित भानोत यांना निवडणूक लढविण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप असूनही त्यांचे उमेदवारांच्या यादीत नाव असल्याचा दावाही सीएसआयने केला आहे.
निवडणुकीची सूचना काढण्याचा अधिकार विशेष सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष एस.रघुनाथ यांना नसून ही सूचना काढण्याचा अधिकार आयओएचे अध्यक्ष विजयकुमार मल्होत्रा यांना आहे. निवडणुकीची अधिसूचना काढतानाच अनेक त्रुटी राहिल्या आहेत. आयओएबाबत सध्या न्यायालयात अनेक दावे सुरू आहेत. त्यामुळे अशा त्रुटींची न्यायालयाकडून गंभीर दखल घेतली जाण्याची शक्यता आहे व निवडणूकच बेकायदेशीर होण्याची शक्यता आहे, असेही सीएसआयने म्हटले आहे.

तायक्वांदो व बॉक्सिंग खेळांच्या प्रतिनिधींना मतदानास मनाई
नवी दिल्ली : तायक्वांदो व बॉक्सिंग या खेळांच्या राष्ट्रीय संघटनांना मतदान करण्यास मनाई करण्यात आल्यामुळे भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या (आयओए) निवडणुकीपुढे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. येत्या रविवारी ही निवडणूक होत आहे. भारतीय बॉक्सिंग महासंघाच्या २०१२च्या निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचे आढळल्यानंतर आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने त्यांची संलग्नताच काढून घेतली आहे. आंतरराष्ट्रीय तायक्वांदो महासंघानेही भारतीय तायक्वांदो महासंघाची संलग्नता काढून घेतली आहे. बॉक्सिंग महासंघास मान्यताच नसल्यामुळे त्यांचा कोणताही प्रतिनिधी या निवडणुकीत भाग घेऊ शकणार नाही, असे आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने आयओएला कळविले आहे. आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप असलेल्यांच्या नावांचा समावेश मतदार यादीत असल्यामुळे ही निवडणूक पारदर्शी होणे शक्य नाही, असे आयओएमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2014 1:47 am

Web Title: indian olympic association election supposed to be a controversial
Next Stories
1 सुधारणा योजनेला मंजुरी देण्यासाठी आज आयसीसीची बैठक
2 एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धा : युकीचा सोमदेववर विजय
3 युवा विश्वचषक स्पध्रेतील सलामीच्या लढतीत पाकिस्तानचे दडपण नाही – विजय झोल
Just Now!
X