भारतात अनेक भागांमध्ये रंगाने काळ्या असणाऱ्या व्यक्तींना वर्णद्वेषी टीकेला सामोरं जावं लागतं. अनेकदा क्रीडा जगतातले अनेक खेळाडू सोशल मीडियावर अशा टीकेचे बळी ठरतात. श्रीलंका दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघातील सलामीचा फलंदाज अभिनव मुकुंदलाही अशाच टीकेला सामोरं जावं लागलं आहे.

मात्र यानंतरही अभिनव मुकंदने संयम राखत आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन, वर्णद्वेषी टीका करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे. “रंगाने गोरी असणारी माणसचं दिसायला सुंदर असतात असं नाही, भारतीयांचा हा दृष्टीकन बदलायला हवा. मी वयाच्या दहाव्या वर्षापासून क्रिकेट खेळतोय. अनेक अडथळ्यांवर मात करत मी आज या स्तरावर पोहचलो आहे. आपल्या देशाचं प्रतिनिधीत्व करणं ही माझ्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे. मला कोणाचीही सहानुभूती नकोय, मात्र भारतीयांचा दृष्टीकोन बदलण्यासाठी मी हे लिहीतो आहे”, आपल्यावर झालेल्या टीकेला मुकुंदने अशा शब्दांमध्ये उत्तर दिलं आहे.

“माझ्या रंगावरुन आतापर्यंत अनेकदा लोकांनी माझ्यावर टीका केली आहे. कधी ती समोरासमोर केली तर कधी माझ्या पाठीमागे. मात्र हा मुद्दा इतका महत्वाचा का ठरतो हे कोडं मला कधीच उलगडलेलं नाही. चेन्नई हे देशातलं सर्वाधीक तापमान असलेल्या शहरांपैकी एक आहे, याच शहरातून मी देशाचं प्रतिनिधीत्व करतोय. लहानपणापासून तहान-भूक विसरुन भर उन्हात मी क्रिकेटचा सराव केला आहे. त्यामुळे साहजिकचं माझा रंग बदलणार ही बाब उघड आहे. त्यामुळे प्रत्येक वेळा एखाद्या व्यक्तीला त्याच्या रंगावरुन टीकेला का सामोरं जावं लागतं?”

अभिनव मुकुंद सध्या श्रीलंकेत आहे. लोकेश राहुलच्या अनुपस्थितीत त्याला पहिल्या गॉल कसोटीत खेळण्याची संधी मिळाली होती. या सामन्यात त्याला पहिल्या डावात फार चांगली कामगिरी करता आली नसली, तरीही दुसऱ्या डावात त्याने ९० धावांची खेळी केली होती. त्यामुळे मुकुंदच्या या संयमी उत्तरानंतर सोशल मीडियावर होणारी वर्णद्वेषी टीका थांबते का हे पहावं लागेल.