वेगवान गोलंदाज टिम साऊदीचे मत

वेलिंग्टन : मयांक अगरवाल आणि पृथ्वी शॉ ही भारताची सलामीची जोडी अननुभवी आहे, पण तरीदेखील आगामी कसोटी मालिकेत आपला प्रभाव पाडण्याची गुणवत्ता त्यांच्यात आहे, असे मत न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साऊदीने व्यक्त केले आहे.

दुखापतीमुळे रोहित शर्माने या मालिकेतून माघार घेतली आहे, तर लोकेश राहुलचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. अशा परिस्थितीत मयांक (९ कसोटी) आणि पृथ्वी (२ कसोटी) यांच्यावर सलामीची जबाबदारी आहे.

‘‘भारत दुखापतीमुळे काही चांगल्या खेळाडूंना मुकणार आहे. मात्र त्यांच्या संघात गुणवत्तेची कमी नाही. अर्थातच मयांक आणि पृथ्वी हे अनुभवी नाहीत, पण ते गुणवान आहेत,’’ असे साऊदी याने म्हटले.

वेलिंग्टनमधील वाऱ्याचा फायदा यजमानांना होईल, असेही त्याने सांगितले. ‘‘वेलिंग्टनच्या मैदानावर खेळण्याचा आमचा अनुभव सर्वात मोठा आहे. अर्थातच भारताच्या संघाला वेलिंग्टनच्या मैदानावर स्वत:ला जुळवून घ्यायला तीन दिवस लागतील. त्यातच भारताचा संघ गेले काही महिने सर्वोत्तम कसोटी क्रिकेट खेळत आहे. या स्थितीत भारताविरुद्धची कसोटी मालिका चुरशीची असेल,’’ असे साऊदीने सांगितले.

न्यूझीलंड संघातील गोलंदाज सहकारी ट्रेंट बोल्ट याचेही साऊदीने कौतुक केले. ‘‘ट्रेंट बोल्ट डाव्या हाताने आणि मी उजव्या हाताने गोलंदाजी करतो. त्यामुळे नवीन चेंडूने प्रतिस्पध्र्याना चकवता येते. चेंडूला स्विंग करण्याची क्षमता आमच्यात आहे. मी आणि बोल्ट दोघे अनेक वर्षे एकत्र क्रिकेट खेळलो आहोत. भारताविरुद्धच्या मालिकेतही आमच्या दोघांची कामगिरी चांगली होईल असा विश्वास आहे,’’ असे साऊदीने सांगितले.