भारतीय वंशाची असलेल्या रूपिंदर कौर ही आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कुस्तीमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करणार आहे. ही स्पर्धा २३ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत ग्लास्गो येथे होणार आहे.
कौर ही मूळची पंजाबची रहिवासी असून या स्पर्धेत ती ५३ किलो गटात उतरणार आहे. या निवडीबद्दल ती म्हणाली, ‘‘ऑस्ट्रेलियाकडून माझी ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा असल्यामुळे त्यामध्ये चमक दाखविण्यासाठी मी खूप उत्सुक झाली आहे. मी शालेय जीवनात पतियाळा येथे राहत होते. तेथे असताना मी ज्युदो स्पर्धामध्ये राज्य व राष्ट्रीय स्तरावर पदकांची कमाई केली आहे. ऑस्ट्रेलियात आल्यानंतर माझ्या ज्युदो प्रशिक्षकांनी मला कुस्तीत सहभागी होण्याचा सल्ला दिला व त्यामुळेच मी या खेळाकडे वळले. मला माझ्या कारकीर्दीसाठी घरच्यांचे सतत प्रोत्साहन मिळाले आहे.’’
कौर हिचे आईवडील सात वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले आहेत. तिने कुस्तीमध्ये येथील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये पदकांची लयलूट केली आहे.