भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारबद्दल एक मोठी माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भुवनेश्वरला यापुढे कसोटी क्रिकेट खेळायचे नाही आणि तो फक्त टी-२० क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत आहे. भुवनेश्वरला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्याला संघात स्थान न मिळाल्याबद्दल अनेक प्रतिक्रिया समोर आल्या.

टाइम्स ऑफ इंडियाशी झालेल्या संभाषणात भुवनेश्वर कुमारच्या जवळच्या सूत्राने खुलासा केला, की भुवीला वनडे क्रिकेटमध्येही रस नाही आणि त्याला फक्त टी-२० खेळायचे आहेत. ”भुवनेश्वर कुमार टी-२० क्रिकेटमध्ये पुढील संधीची तयारी करत आहे. त्याला यापुढे कसोटी क्रिकेट खेळायचे नाही. आता त्याची लय गेली आहे. खरे सांगायचे झाले, तर भुवी एकदिवसीय क्रिकेट खेळण्यासही इच्छुक आहे, असे निवड समितीलासुद्धा वाटत नाही. भारतीय संघाचे हे मोठे नुकसान आहे, कारण जर इंग्लंड दौर्‍यासाठी कोणत्याही खेळाडूला संघात असायला हवे होते, तर तो भुवनेश्वर कुमार होता”, असे सूत्राने सांगितले.

भुवनेश्वर कुमारने जानेवारी २०१८मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला होता. मात्र, यानंतर दुखापतीमुळे तो संघात आत-बाहेर होत राहिला. भुवनेश्वर कुमार आतापर्यंत बर्‍याच वेळा दुखापतग्रस्त झाला आहे आणि यामुळे तो आयपीएल किंवा भारताकडून सातत्याने खेळू शकला नाही. कदाचित यामुळेच भुवनेश्वरने कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

इंग्लंड आणि भुवनेश्वर कुमार

भुवनेश्वरने २०१९मध्ये भारताकडून कसोटी सामन्यात पदार्पण केले होते. त्यानंतर आतापर्यंत त्याने केवळ २१ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने २६.०९च्या सरासरीने ६३ बळी घेतले आहेत. भुवनेश्वरने इंग्लंडविरुद्ध ५ कसोटीत १९ बळी घेतले आहेत. २०१४च्या दौऱ्यात भुवीने ही कामगिरी केली होती. त्या मालिकेत तो भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा होता.