दिवसेंदिवस सोशल नेटवर्किंग साईट्सवर मोठ-मोठ्या व्यक्तींना ट्रोल करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसतेय. एखाद्या घटनेचा उल्लेख करताना काही चुक झाली तर अनेक मोठ्या लोकांना नेटीझन्सनी ऑलनाईन ट्रोल केलं आहे. मात्र धर्माच्या आधारावर एखाद्या खेळाडूवर टीका करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसते आहे. बुरखा न घालता पत्नीचा फोटो फेसबूकवर शेअर केल्यामुळे नुकतचं इरफान पठाणला फेसबूकवर ट्रोल करण्यात आलं होतं, आता भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी या ‘ट्रोल’भैरवांच्या टीकेचा धनी ठरला आहे.

मोहम्मद शमीने आपली मुलगी आयराचा दुसरा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला. या वाढदिवसाचे फोटो शमीने आपल्या फेसबूक प्रोफाईलवर शेअर केले आहेत. मात्र इरफान पठाणप्रमाणेच या पोस्टवर लोकांनी शमीवर टीका केली आहे.

कित्येकांनी शमीला, आपल्या पत्नीचा हिजाब शिवाय फोटो काढल्यावरुन सुनावलं असून काहींनी इस्लाममध्ये वाढदिवस साजरा करण्याची पद्धत नसल्याचं सांगत लहानग्या आयराच्या सेलिब्रेशनवरही विरझण टाकलंय. काही नेटीझन्सनी तर, तू हिंदुत्ववाद्यांना खूश करण्यासाठी असले प्रकार करत असल्याची खरमरीत टीका केली.

अवश्य वाचा – तुला हे वागणं शोभतं का? इरफान पठाणचं चाहत्यांकडून ट्रोलिंग

याआधीही शमीला अशाच प्रकारे ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं. आपल्या पत्नीचे पाश्चिमात्य पोषाखांमधले फोटो फेसबूकवर टाकल्याने शमीला लोकांनी ट्रोल केलं होतं. मात्र त्यावेळी शमीने त्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं होतं. मात्र यावेळी शमीने या प्रकारावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये.

अवश्य वाचा – भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीला शिवीगाळ, मारहाणीचा प्रयत्न