इंग्लंड दौर्‍यावर जाणार्‍या टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा करोनातून सावरला आहे. आता तो २३ मे रोजी बंगळूरहून मुंबईला पोहोचणार आहे. आयपीएल २०२१मध्ये करोना पॉझिव्ह आढळलेल्या कोलकाता नाइट रायडर्सच्या (केकेआर) चार खेळाडूंमध्ये कृष्णाचा समावेश होता.

केकेआरच्या वरुण चक्रवर्ती, संदीप वॉरियर आणि टिम सेफर्ट यांनाही कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचे आढळले. उर्वरित तीन खेळाडूदेखील करोनातून पूर्णपणे सावरले आहेत. खेळाडूंना करोनाची लागण झाल्यानंतर ४ मे रोजी आयपीएल पुढे ढकलण्यात आले. स्पर्धेत फक्त २९ सामने खेळवण्यात आले असून ३१ सामने बाकी आहेत.

काय सांगता..! एकेकाळी वर्ल्डकप जिंकलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचा खेळाडू आज करतोय ‘सुतारकाम’

कृष्णाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण

यावर्षी इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत कृष्णाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यात त्याने ६ विकेट्स घेतल्या. आता आगामी इंग्लंड दौर्‍यासाठी निवडलेल्या संघात स्टँडबाय म्हणून त्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यांच्याशिवाय वेगवान गोलंदाज आवेश खान, अर्जन नागवासवाला आणि फलंदाज अभिमन्यू ईश्वरन यांचादेखील समावेश आहे.

भारतीय संघ २ जून रोजी इंग्लंड दौर्‍यावर रवाना होईल. तेथे हा संघ प्रथम न्यूझीलंडविरूद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळेल. हा सामना १८ ते २२ जून दरम्यान असेल. यानंतर टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळेल. ४ ऑगस्टपासून नॉटिंगहॅमध्ये याची सुरुवात होईल. मालिकेचा शेवटचा सामना मँचेस्टरमध्ये १० सप्टेंबर रोजी खेळला जाईल.

दोन देशांकडून क्रिकेट खेळलेल्या खेळाडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

भारतीय संघ सध्या मुंबईत १४ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण करीत आहे. २ जून रोजी हा संघ इंग्लंडला रवाना होईल. टीम इंडियासाठी चांगली गोष्ट म्हणजे, त्यांना फक्त तीन दिवस इंग्लंडमध्ये क्वारंटाइन राहणे आवश्यक आहे. पूर्वी हा कालावधी १० दिवसांचा होता. परंतु बीसीसीआयने इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला (ईसीबी) हा कालावधी कमी करण्याची विनंती केली. बीसीसीआयची विनंती ईसीबीने मान्य केली आहे या विश्रांतीनंतर टीम इंडिया इंग्लंडमध्ये पोहोचण्याच्या चौथ्या दिवसापासून सराव करण्यास सक्षम असेल.